श्रद्धा असावी पण डोळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:22 PM2017-11-17T23:22:08+5:302017-11-17T23:22:36+5:30
जगातल्या सर्वच धर्मानी श्रद्धा मानली आहे. पण, गुरुबद्दल शंका घ्यायची नाही. चिकित्सा करायची नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : जगातल्या सर्वच धर्मानी श्रद्धा मानली आहे. पण, गुरुबद्दल शंका घ्यायची नाही. चिकित्सा करायची नाही. ही मानसिकता कायम राहिल्यास श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होते. त्यामुळे माणसांनी श्रद्धा ठेवलीच पाहिजे. मात्र, ती डोळस असावी, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले. स्थानिक पंचशील वसतिगृहाच्या प्रांगणात आयोजित वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर ते बोलत होते.
व्याख्यानाचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता बनपूरकर यांनी केले. यावेळी आमदार विजय वडेट्टीवार, राष्टÑीय अभियान प्रमुख सुरेश झुरमुरे, अॅड. गोविंद भेंडारकर, अशोक रामटेके, अ. भा. अंनिसचे तालुका अध्यक्ष डॉ. खिजेंद्र गेडाम, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, हरिभाऊ पाथोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. मानव यांनी म्हणाले, श्रद्धा ठेवल्यानंतर शंका घेतली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे. पुरावा आढळल्यास तपासणीही केली पाहिजे. नवा पुरावा आला तर विचार बदलला पाहिजे. तरच श्रद्धचे रुपांतर अंधश्रद्धेमध्ये होणार नाही. शोषणाला आळा बसेल. अंधश्रद्धेला आळा घालण्यासाठी जगातील पहिला कायदा महाराष्टÑात अंमलात आला. जाऊटोणा विरोधी कायदा मजबूत करावयाचा आहे. त्यासाठी हे अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या निमित्ताने अनेक बाबांचा कसा भंडाफोड करण्यात आला, यावरही प्रा. मानव यांनी प्रकाश टाकला. महाराष्टÑात संत परंपराची महती सांगून प्रा. मानव म्हणाले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कर्मयोगी गाडगेबाबा, राष्टÑसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांनी अर्थाने समाजजागृती केली आहे. मंत्रशक्तीच्या नावाखाली रासायनिक पदार्थांचा सर्रास वापर केला जाता,े हे समजून देण्यासाठी काही प्रात्यक्षिकेही सादर केली. मांत्रिकांवर हल्लाबोल चढविण्यात आला. जादूटोणा विरोधी कायद्याची महत्त्वपूर्ण १२ कलमे सांगून महिला व सर्व घटकांना सावध राहण्याचे आवाहन प्रा. मानव यांनी केले आहे. याप्रसंगी आमदार विजय वडेट्टीवार, नगराध्यक्षा योगीता बनपूरकर, सुरेश झुरमुरे, अॅड. गोविंद भेंडारकर यांनी विचार मांडले. आ. वडेट्टीवार यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गरज अधोरेखित केली. युवापिढीने या चळवळीला सक्षम करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक व परिचय डॉ. खिजेंद्र गेडाम, संचालन प्रा. बालाजी दमकोंडावार यांनी केले. आभार शशिकांत बांबोळे यांनी मानले. व्याख्यानाप्रसंगी बहुसंख्य महिला युवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, प्राध्यापक आणि शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.