माना समाजबांधव रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 10:21 PM2019-03-05T22:21:22+5:302019-03-05T22:21:52+5:30
माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही दिरंगाई होत आहे. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभूळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : माना समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्यावे, असा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही दिरंगाई होत आहे. समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ माना समाज कृती समितीचे संयोजक नारायण जांभूळे यांच्या नेतृत्वात २६ फेब्रुवारीपासून साखळी व आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली. मात्र प्रशासनाने अजून दखल घेतली नाही. त्यामुळे उपोषणाच्या आठव्या दिवशी मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयापुढे हजारो समाज बांधव उपस्थित झाले. तिथेच त्यांनी दिवसभर धरणे दिले. शासनाने माना समाजाचा अंत पाहू नये, अन्यथा धडा शिकवू, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.
नारायण जांभूळे यांच्या उपोषणाच्या आठव्या दिवशी हजारो समाज बांधवांनी धरणे दिले. उपोषणकर्ते जांभुळे यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी शनिवारी उपजिल्हा रूग्णालयात भरती केले होते. दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान आज मंगळवारी हजारो समाजबांधव या ठिकाणी उपस्थित झाले. तिथेच धरणे दिले. त्यानंतर तहसीलदार संजय नागतीलक, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी केशव बावनकर यांनी नारायण जांभुळे यांनी सुरू केलेल्या उपोषण मंडपाला भेट देऊन समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. त्यामुळे उपोषणाची सांगता झाली.
यावेळी बळीराम गडमडे, अरविंद सांडेकर,रामराव ननावरे, देविदास जांभुले, मंदाताई चौखे, कुलदीप श्रीराम,वाल्मिक ननावरे, विलास चौधरी, सुरेंद्र मानमुंढरे, नामदेव घोडमारे, मनोहर जांभुळे, शंकर भरडे, रामदास चौधरी आदी उपस्थित होते.
अशा आहेत मागण्या
जात प्रमाणपत्र वैधता सहा महिन्यात निकाली काढावी, आप्तसंबंध गृहित धरण्यासाठी १९८५ रोजीचा आदेश व मानववंश शास्त्राने दिलेल्या माहितीचा आधार घ्यावा, विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणांचा निपटारा करावा, न्यायालयाच्या आदेशानुसार माना, माने, मानी हे एकच असल्याबाबत परिपत्रक काढावे, डोमा गावाजवळील मुक्ताई देवस्थानला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा, सुरजगड किल्ल्यावरील ठाकूर देव व देवस्थान परिसरातील अवैध खननाला आळा घालावा, वैरागड, माणिकगड, सुरजागड किल्ल्यांना ऐतिहासिक वारसा स्थळ जाहीर करण्याची मागणी माना समाजाने केली.
३६ जणांना अटक व सुटका
नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील हजारोच्या संख्येत माना समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांनी ३६ जणांना अटक करून काही वेळाने सुटका केली. यामध्ये १७ महिला व १९ पुरुषांचा समावेश होता.