‘त्या’ शेतातील पिकांची निगा राखते ‘ती’ घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 04:27 PM2018-06-28T16:27:44+5:302018-06-28T16:28:05+5:30
सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतीची मशागत...त्यानंतर पेरणी...धरित्रीच्या उदरातून अकुंरलेल्या बीजांपासून ते उत्पन्न घरी येईपर्यंत पिकाला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे लागते. ही खटाटोप करूनही उत्पन्न हाती नाही लागले, तर शेतकरी हवालदिल होतो आणि मग तो नैराशात वावरतो. परंतु चंद्रपुरातील एका तरुण शेतकऱ्याने नैराशाच्या गर्तेत न राहता वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी अफलातून शक्कल शोधून काढली. आता त्याच्या पिकांचे रक्षण त्याने शेतीत लावलेली स्वयंचलित घंटा करीत आहे. या यंत्राचे त्यांनी शेतरक्षक असे नामकरणही केलेले आहे. हे यंत्र पूर्णत: वॉटर प्रूफ असल्यामुळे विद्युत शॉकचा धोका नाही, हे विशेष.
सुहास पिंगे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव. त्यांचे वास्तव्य चंद्रपुरातील गोकुळ गली येथे आहे. त्यांची शेती वरोरा तालुक्यातील गौळ येथे आहे. त्याच्या शेतीचा ४० टक्के भाग हा जंगलाला लागून आहे. रानडुक्कर, चितळ, नीलगाय व ससे या वन्यजीवांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीची नासाडी होत होती. अनेक उपाय करूनही यात त्यांना यश आले नाही. रात्री माणसे जागलीला जात होती. तरीही वन्यजीव जुमानत नव्हते. यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी सोलर पॉवर कुंपण मशीनही लावून बघितली. तरीही काहीएक उपयोग झाला नाही. पिंगे यांनी आयटीआयमध्ये इलेट्रॉनिक्स ट्रेडचे शिक्षण घेतलेले आहे. हा अनुभव पाठीशी असल्याने त्यांनी पीक संरक्षणासाठी अनोखा प्रयोग करून बघितला आणि यात त्यांना यश आले.
सुहास पिंगे यांनी विद्युतवर चालणारी स्वयंचलित घंटा तयार केली आहे. त्यासाठी त्यांना केवळ साडेपाच हजार रुपयांचा खर्च आला. १२ वॅटची बॅटरी, आॅटोस्टार्ट, स्पीकर, सर्च लाईट व ताट असे साहित्य वापरात आणले आहेत. दिवसभर शेतात काम केल्यानंतर घरी जाताना ही घंटा सुरू करून ठेवायची. प्रत्येक पाच मिनिटांची विश्रांती घेत ३० सेकंद मंदिरातील घंटा वाजत असल्यागत ती वाजत राहते. हे चक्र तिला विद्युत करंट मिळेपर्यंत कायम राहते. सकाळी शेतात गेल्यानंतर ती घंटा परत बंद करून ठेवतात. ही स्वयंचलित घंटा लावल्यापासून वन्यजीवांचा त्रास कायमचा बंद झाला असल्याचे शेतकरी सुहास पिंगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.