बैलजोडी गेली; मशागत कशी करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 11:33 PM2018-05-07T23:33:02+5:302018-05-07T23:34:14+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही.
शशिकांत गणवीर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी नेहमीच अस्मानी, सुलतानी संकटांना बळी ठरत असतो. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने शेतपीक धोक्यात येत असून शेती हमखास पिकेलच याची शाश्वती आता बळीराजाला राहिलेली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल असून आर्थिक विवंचनात सापडल्याचे चित्र आहे. अशातच ७० हजार खर्चुन नवी बैलजोडी घेतली. मात्र वीज पडून डोळ्यादेखत दोन्ही बैलांचा तडफडून मृत्यू झाला. आता खरीप हंगामात मशागत कशी करायची, असा प्रश्न आपादग्रस्त शेतकºयापुढे उभे ठाकला आहे.
मागील काही दिवसात उन्हाळ्याच्या तीव्र दाहकतेने मानवासह सर्वाचीच लाहीलाही होत असतानाच वादळी वाºयाने जिल्ह्याला झोडपले. या वादळात अनेकांची घरे उद्ध्ववस्त होऊन निवाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळ व मेघगर्जनेत मूल तालुक्यातील सिंतळा येथील नागेंद्र घोनडे यांच्या अंगणात बांधून असलेल्या लाल्या-पांढऱ्या नामक बैलजोडीवर वीज कोसळली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. या अचानक आलेल्या संकटाने शेतकरी हादरला. डोळ्यादेखत नवीन घेतलेली बैलजोडी क्षणार्धात मृत पावल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले अन् शेतकरी ढसाढसा रडला.
मागील वर्षी पडलेल्या अत्यल्प पाऊस व धानपिकावर आलेल्या रोगाने धानपिक उद्ध्वस्त झाले. उत्पन्न निम्यावर आले. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. अशातच येणाऱ्या हंगामाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. शासनाची कर्जमाफीचीही तारीख पे तारीख होत असल्याने नव्याने कर्ज मिळेल की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
नवीन हंगामाच्या मशागतीकरिता सिंतळा येथील शेतकरी नागेंद्र घोनडे यांनी ७० हजार रुपयांची बैलजोडी खरेदी केली होती. अन् या जोडीवर काळाने घाला घातल्याने शेतकरी हादरला आहे. या घटनेचा पंचनामा, शवविच्छेदन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. मात्र प्रशासनाकडे निधीच उपलब्ध नसल्याचे समजते. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदत केव्हा मिळेल, याची शाश्वती नसल्याने येणाऱ्या हंगामाची मशागत कशाने करायची, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सदर शेतकऱ्याला तत्काळ निधी मंजूर करून मिळणारी नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.