लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा; नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:23 PM2024-09-25T14:23:11+5:302024-09-25T14:24:15+5:30
जिल्ह्यात सहा लाखांवर नोंदणी : दोन महिन्यांचे मिळाले अनुदान
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दोन महिन्यांचे अनुदान मिळाल्यानंतर 'लाडक्या बहिणीं'ना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. यापूर्वी १५ ते २८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात तीन टप्प्यांत या अनुदानाचे वितरण झाले होते. सप्टेंबर महिना संपत येत असल्याने आता तिसऱ्या महिन्याच्या अनुदानाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या ४ लाखांवर पोहोचली आहे.
राज्य शासनाने जून महिन्यात राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा पात्र महिलेला १ हजार ५०० रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतील काही अटी कमी करीत, राज्य शासनाने ही योजना सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
नोंदणी केलेल्या महिलांची संख्या ४ लाखांवर गेली आहे. यापैकी काही महिलांचे आधार सीडिंग झालेले नव्हते, त्यालाही गती देत बहुतांशी महिलांची बँक खाती आधारशी जोडली गेली असून, त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आता मात्र लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, आजही अनेक महिलांची अर्ज करण्यासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघायला मिळत आहे.
सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदणीसाठी मुदत या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे अजूनही या योजनेसाठी अर्ज दाखल होत आहेत. मुदतीत आलेल्या अर्जाची छाननी करून पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे अनुदान दिले जाणार आहे.
"माझी लाडकी बहीण योजनेचे पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील अनुदान जमा केले जाणार आहे. कोणतेही अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ दिला जात आहे."
- दीपक बानाईत महिला व बालकल्याण अधिकारी, चंद्रपूर