न.प.अरसोडावासीयांसाठी फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 11:38 PM2017-09-20T23:38:16+5:302017-09-20T23:38:38+5:30
राज्य शासनाने नुकतीच आरमोरी नगर परिषदेची अधीसूचना जाहीर केली असून या अधीसूचनेत आरमोरी नगर परिषदेत अरसोडा, पालोरा हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : राज्य शासनाने नुकतीच आरमोरी नगर परिषदेची अधीसूचना जाहीर केली असून या अधीसूचनेत आरमोरी नगर परिषदेत अरसोडा, पालोरा हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र अरसोडावासीयांनी आरमोरी नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेमध्ये शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात येतो. पालिकेतर्फे विविध योजना राबविण्यात येणार असून अरसोडावासीयांना या योजनांचा लाभ मिळणार आहे. एकूणच गावाच्या विकासासाठी नगर परिषद फायदेशिर राहील, असा विश्वास आ. कृष्णा गजबे यांनी व्यक्त केला आहे.
अरसोडा ग्रामवासी चुकीच्या संभ्रमात असल्याने नगर परिषद झाल्यावर त्यांना ग्रामीण, पंचायत समितीस्तरावरील योजनांचा लाभ मिळणार नाही, असे त्यांचे मत आहे. मात्र पं. स., जि.प. व ग्रा. पं. स्तरावर असलेले रस्ते, नाली बांधकाम, जलयुक्त शिवार योजना, रोजगार हमी योजना, घरकूल तसेच शेतीपयोगी अवजारे व साहित्य नगर परिषदेमार्फत अरसोडावासीयांना मिळणार आहे. सदर योजना पालिका झाल्यानंतर बंद होणार नाही, असे आ. गजबे यांनी म्हटले आहे. शेतकरी व सर्वसामान्य विकासाच्या योजना नगर परिषद क्षेत्रात कार्यान्वित राहतील, असे फेरबदल राज्य शासनाने केले आहे. त्यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी पालिकेमार्फत नव्या योजना तयार करता येऊ शकते व त्यासाठीचा निधी राज्य शासन देण्यास तत्पर आहे, असेही आ. गजबे यांनी म्हटले आहे.
आरमोरी नगर परिषद क्षेत्राच्या विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करून राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणार असून यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल आहेत, असेही आ. कृष्णा गजबे यांनी म्हटले आहे.
आराखडा तयार व्हावा
आरमोरी शहराच्या विकासासाठी यापूर्वीच आपण राज्य शासनाकडून पाच कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. निवडणुकीनंतर विराजमान होणारे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी मिळून अरसोडा, पालोरा, शेगाव व आरमोरी शहर विकासाचा संयुक्त विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. यात शेती, रस्ते, आरोग्य, पाणी सुविधेचा समावेश असावा.