आम आदमी विमा योजनेपासून लाभार्थी वंचित
By admin | Published: February 9, 2017 12:44 AM2017-02-09T00:44:34+5:302017-02-09T00:44:34+5:30
ग्रामीण भागातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात.
जनजागृतीचा अभाव : प्रभावी अमंलबजावणी आवश्यक
चंद्रपूर : ग्रामीण भागातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. परंतू जनजागृतीअभावी व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे या योजना ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे शासनाने सुरु केलेल्या आम आदमी योजनेपासून ग्रामीण भागातील अनेक शेतकरी वंचीत आहेत.
ग्रामीण परिसरातील नागरिकांसाठी शासनाने सुरू केलेली आम आदमी विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावण्यास मदत मिळणार होती. परंतु जनजागृतीचा अभाव व लाभार्थ्यांना माहिती देण्यास संबंधित कर्मचाऱ्यांची टाळाटाळ यामुळे ग्रामीण भागातील शेकडो नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. ग्रामीण भागातील आम आदमी केंद्र मानून शासनाने २००७ मध्ये आम आदमी विमा योजना सुरू केली. ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील आम आदमी या योजनेचा लाभार्थी होवू शकतो.
सुरुवातीला फक्त भूमिहीन कुटुंबातील लाभार्थीच या योजनेकरिता पात्र ठरत होते. परंतु योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून ८ जून २०११ रोजी शासनाने काढलेल्या एका नवीन अध्यादेशानुसार पाच एकरापेक्षा कमी जिरायती व अडीच एकरापेक्षा कमी बागायती शेतजमीन असलेली म्हणजेच अल्पभूधारक व्यक्तीही या योजनेची लाभार्थी होऊ शकते. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्याकडे देण्यात आली आहे. या योजनेची बऱ्याच लोकांना माहितीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही योजना खऱ्या अर्थाने पोहोचलीच नाही. (नगर प्रतिनिधी)
फलक झाले गायब
आम आदमी विमा योजनेच्या अधिक माहितीकरिता शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे नमूद करण्यात आले होते. परंतु आता हे फलकही दिसेनासे झाले आहे. तसेच याबाबत योग्य त्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांना या योजनेपासून वंचीत राहावे लागत आहे.