ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेपासून लाभार्थी अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:13+5:302021-07-27T04:29:13+5:30
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही १ जून २०१७ पासून नाव बदलवून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना करण्यात ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही १ जून २०१७ पासून नाव बदलवून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना करण्यात आली. ही योजना एकप्रकारे गरिबांसाठी संजीवनीच आहे. या योजनेंतर्गत रुग्णाला मोफत शस्त्रक्रिया, औषधे, जेवण व प्रवास खर्च दिला जातो. याची मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत असते. ९९६ प्रकारच्या कुठल्याही शस्त्रक्रियेवर उपचार खासगी व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत होत असतात. अडीच लाख रुपयांपर्यंत किडनी रोपणसाठी शस्त्रक्रिया मोफत होते. परंतु, एक किडनी जवळच्या नातेवाइकांना किंवा मित्रपरिवाराकडून द्यावी लागते.
कुठल्याही रुग्णालयात जाताना पिवळे, केशरी, अंत्योदय व अन्नपूर्णा रेशनकार्ड आणि अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील पांढरे रेशनकार्डधारक रुग्णांकरिता, शेतीचा सातबारा यापैकी एकाची गरज असते. त्याचप्रमाणे आधारकार्ड किंवा मतदान कार्ड तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचे फोटो पासबुक, यापैकी कोणताही एक ओळखपत्र पुरावा शासनाने योजनेंतर्गत अंगीकृत केलेल्या खासगी व शासकीय रुग्णालयात आरोग्यमित्र या काउन्टरवर नोंदणी केल्यानंतरच मोफत शस्त्रक्रिया केली जाते. याचा लाभ गरजवंतांना मिळावा, यासाठी शासनाने जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.