घरकूल बिलासाठी लाभार्थ्यांची पायपीट
By admin | Published: May 24, 2016 01:21 AM2016-05-24T01:21:26+5:302016-05-24T01:21:26+5:30
गरीब व गरजु कुटुंबांना राहण्यासाठी हक्काचे घर असावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजना सुरू केल्या.
वरिष्ठांनी लक्ष द्यावे : लेखापाल देतो लाभार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’
संघरक्षित तावाडे जिवती
गरीब व गरजु कुटुंबांना राहण्यासाठी हक्काचे घर असावे म्हणून शासनाने त्यांच्यासाठी इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजना सुरू केल्या. त्यानुसार अशा लोकांना घर तर मंजूर करण्यात आले पण त्या लोकांना बिलासाठी पंचायत समिती कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयातील लेखापाल हे या लाभार्थ्यांना ‘तारीख पे तारीख’ देवून बोलावत असल्याचे लाभार्थ्यांनी लोकमतजवळ बोलताना सांगितले.
जिवती तसा मागासवर्गीय लोकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यांना राहण्यासाठी घर असावे, यासाठी घरकूल मंजूर करण्यात आले. पण अजूनही दोन ते तीन वर्ष लोटले असले तरी त्या लाभार्थ्यांना बिलाची रक्कम मिळालेली नाही. कोणाला एक बिल मिळाले तर कोणाला आतापर्यंत एकही बिल मिळालेले नाही.
लोकमत प्रतिनिधीने कार्यालयात फेरफटका मारला असता तिथे जमा असलेल्या लाभार्थ्यांनी आपली आपबिती सांगितली. गेल्या आठवड्यात आम्ही बिलासाठी आलो. परंतु येथील लेखापाल एस.आर. निंबेकर यांनी सोमवारला या असे सांगून आम्हाला परत पाठविले. आज आम्ही त्यांनी बोलावल्याप्रमाणे कार्यालयात आलो. परंतु ते स्वत: कार्यालयात हजर नाही. त्यामुळे आम्ही येण्याजाण्याचा पैसा खर्च करून कितीदा यावे, हा प्रश्न आमच्यासमोर पडल्याचे त्यांनी सांगितले.
रावसाहेब घाडगे, पुनागुडा, चिनू जैतु, मेश्राम, पुनागुडा विठ्ठल नैताम जनकापूर, गुंडेराव आत्राम जनकापूर, मारू सिडाम, पाटागुडा, रामु सिडाम पाटागुडा हे सर्व घरकूल लाभार्थी उन्हातान्हात बिलासाठी कार्यालयात आले होते. यापैकी बरेचसे लाभार्थी हे अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. लेखापाल एस.आर. निंबेकर हे भेटले तरी बिल देत नाही.कधी नंतर या असे सांगून वेळ मारून नेतात तर कधी बोलावूनसुद्धा हजर राहत नाही, असेही सांगितले. एका लाभार्थ्याने येत्या १५ दिवसात माझ्या मुलीचे लग्न आहे. माझ्याजवळ असलेले पैसे मी घरकुल बांधकामात गुंतविले आणि आता जर बिल मिळाले नाही तर खुप मोठी अडचण निर्माण होईल असे बोलून नाराजी व्यक्त केली.