प्रपत्र ‘ड’मध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2022 05:00 AM2022-03-20T05:00:00+5:302022-03-20T05:00:35+5:30
उश्राळ मेंढा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच्या प्रपत्र ‘ड’यादीमध्ये उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाळा या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झालेली आहेत. या कारणास्तव उश्राळ मेंढा गावातील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी रजिस्ट्रेशन करताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय त्यांना लाभ देता येणार नाही, असे संबंधित विभागाकडूनही सांगण्यात आले आहे. त्यामुळे गाववासीय लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा येथील ग्रामपंचायतअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ‘ड’मध्ये उश्राळ मेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाला या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झाल्याने उश्राळ मेंढा गावातील लाभार्थी घरकुलांच्या लाभापासून वंचित राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, सदर गावांची नावे वगळून उश्राळमेंढा येथील लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात यावीत, अशी ग्रामपंचायतची मागणी असून, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
उश्राळ मेंढा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच्या प्रपत्र ‘ड’यादीमध्ये उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाळा या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झालेली आहेत. या कारणास्तव उश्राळ मेंढा गावातील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी रजिस्ट्रेशन करताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय त्यांना लाभ देता येणार नाही, असे संबंधित विभागाकडूनही सांगण्यात आले आहे. त्यामुळे गाववासीय लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दरम्यान, या समस्येचा लवकरच निपटारा होईल, असे वारंवार घरकुल विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अजूनपर्यंत सदर प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. मात्र, इतर गावांना लक्षांक प्राप्त होऊन प्रपत्र ‘ड’ची घरकुले बांधकामास सुरुवातही झालेली आहे आणि सदर गावातील लाभार्थी वंचित राहण्याची संभावना निर्माण झाली असून, लाभार्थी वारंवार ग्रामपंचायतीला घरकुलाबाबत विचारणा करीत आहेत. यासाठी संबंधित विभागाने उश्राळमेंढा ग्रामपंचायतीला अनवधानाने समाविष्ट झालेल्या गावांची नावे वगळून गावातील घरकुल लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सरपंच हेमराज लांजेवार, रूपाली रत्नावार, जिल्हा परिषद गटनेता डॅ. सतीश वारजूकर आदींची उपस्थिती होती.