लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:54 PM2018-10-07T21:54:02+5:302018-10-07T21:54:32+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सर्वांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली. या योजनतंर्गत शहरातील २१ हजार ५८० जणांंनी घरकुलासाठी शासन दरबारी अर्ज केले. यातील १९ हजार ७६४ अर्ज पात्र ठरविण्यात आले आहे. त्यातील दोन हजार २२२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र यात पात्र लाभार्थ्यांनाही अद्यापही घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रशासनाने केवळ गाजर दाखवून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेतंर्गत घरे बांधुन देण्यात यावी, योजनेतील अटी शिथील करुन अपात्र ठरलेल्या अर्जदारांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, तसेच या योजनेची पूनर्प्रक्रिया सुरु करुन अधिकाधिक नागरिकांना घरकुलाचा लाभ द्यावा, आदी मागण्यांसाठी किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात २० आॅक्टोबरला जैनभवन जवळील कार्यालयाजवळून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
चार घटकांमध्ये घरकुल योजना
महाराष्ट्र शासन गृहनिर्माण विभागाच्या वतीने सन २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व सामन्यांना घर मिळावे, या हेतुने, चार घटाकांमध्ये घरकुल योजना आखण्यात आली आहे. यामध्ये जमिनीची साधनसंपत्ती म्हणून वापर करुन त्याच ठिकाणी घराचे पुनर्निर्माण करणे, घर बांधकामांसाठी कर्ज संलग्न व्याज अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे, भागेदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मीती करणे, आणि आथिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना व्यक्तिगत घरकूल बांधण्यास अनूदान देणे या घटकांचा समावेश आहे. या चारही घटकात मोडणाºया अनेकांनी घरकुलासाठी अर्ज केला मात्र अजूनही त्यांना घरकुलांचा लाभ मिळाला नाही.