‘त्या’ लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 11:27 PM2018-01-28T23:27:25+5:302018-01-28T23:27:43+5:30
घरकूल न बांधताच घरकूल बांधून पूर्ण झाल्याची नोंद जिवती पंचायत समितीमध्ये असल्याने जनकापूरच्या अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला.
फारुख शेख।
आॅनलाईन लोकमत
पाटण : घरकूल न बांधताच घरकूल बांधून पूर्ण झाल्याची नोंद जिवती पंचायत समितीमध्ये असल्याने जनकापूरच्या अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यामुळे प्रशासन खळबळून जागे झाले आणि लाभार्थ्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली. घरकूलापासून वंचित राहणाºया सर्व लाभार्थ्यांना आता नव्याने घरकूल बांधून देण्यात येणार आहे.
जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापूर येथील गुंडेराव भीमू आत्राम, विठ्ठल लटारी नैताम यांना इंदिरा आवास योजने अंतर्गत एक लाख रुपये किंमतीचे घरकूल सन २०१३-१४ या वर्षांत मंजुर झाले. तत्कालीन ग्रामसेवकांनी सदर लाभार्थ्यांना घरकूलाचे बांधकाम सुरू करण्यास सांगितले. त्यानुसार लाभार्थ्यांनी आपले कच्चे घरे पाडून घरकूल योजनेचे घर बांधण्यास सुरूवात केली व बँकेचे खातेही काढले.
एका महिन्यानंतर जिवती पंचायत समितीमध्ये पहिल्या बिलासाठी लाभार्थी गेले असता, त्यांना धक्काच बसला. शासन दरबारी आपले घरकूल बांधकाम पूर्ण झाले, अशी नोंद असल्याचे त्यांना आढळून आले होते. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘शौचालयापाठोपाठ आता घरकूलही गायब’ असे वृत्त प्रसिद्ध केले असता, जिल्हा प्रशासन खळबळून जागे झाले.
तालुका संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रणव बक्शी यांनी लाभार्थ्यांची भेट घेऊन तुम्हाला लवकरच घरकूलाची रक्कम मिळेल, असे आश्वासन दिले.
जनकापूर येथील त्या लाभार्थ्यांची भेट घेतली असून लिपिकाच्या चुकीमुळे त्यांचे घरकूल बांधून पूर्ण झाले, अशी नोंद करण्यात आली होती. त्या लाभार्थ्यांना ९५ हजार रुपयाचे घरकूल लवकरच बांधून दिले जाईल.
- प्रणव बक्शी,
सहायक प्रकल्प अधिकारी
गेल्या तीन ते चार वर्षांपासून आपण पाठपुरावा करीत होतो. परंतु अधिकारी व कर्मचारी कोणताच प्रतिसाद देत नव्हते. ‘लोकमत’ने आमची आपबिती प्रकाशित केल्याने अवघे जिल्हा प्रशासन आमच्या दारी आले. लोकमत वृत्तपत्राचे मनपूर्वक आभार.
- विठ्ठल नैताम, लाभार्थी.