कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 11:06 PM2018-03-27T23:06:53+5:302018-03-27T23:06:53+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि रोजगार हमी योजनेचे दायित्व स्वीकारणाऱ्या शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने प्रसिध्दी रथाची सुरूवात करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि रोजगार हमी योजनेचे दायित्व स्वीकारणाऱ्या शासनाच्या नियोजन विभागाच्या वतीने प्रसिध्दी रथाची सुरूवात करण्यात आली. यातील योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी व्यक्त केले. मंगळवारी माहिती रथाला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ते बोलत होते.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) कल्पना निळ आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. समृध्द महाराष्ट्र जनकल्याण योजनेंतर्गत येणारे गावातील रस्ते, गाय, म्हैस यांच्याकरिता गोठा, पक्के तळे, अमृत कुंड, शेततळे, अहिल्यादेवी सिंचन विहिर, कल्पवृक्ष फळबाग लागवड, ग्राम सबलीकरणाची समृद्ध ग्राम योजना, स्मशानभूमी बांधकाम, क्रिडागंण, अंगणवाडी, निर्मल शौचालय, समृद्ध गावतलाव, अंकुर रोपवाटिका, भूसंजीवनी कंपोष्ट, भूसंजीवनी गांडूळ खत निर्मिती, आदी विविध योजनांची माहिती या चित्ररथातून देण्यात येत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सामान्य जनतेला मिळालेल्या दहा अधिकारांची माहितीदेखील चित्ररथातून दिली जाणार आहे. योजनेची माहिती घेऊन प्रत्यक्षात उपयोगात येणाऱ्या लाभाच्या योजना ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांकडून माहिती घ्यावी. तसेच तहसील कार्यालयातूनही अर्ज भरून लाभ घेता येतो. सरपंचांनी या चित्ररथाचे स्वागत करुन गावकºयांना माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी मदत करावी, असे मत उपजिल्हाधिकारी निळ यांनी केले आहे. हा चित्ररथ पुढील पंधरा दिवस जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रचारासाठी जाणार असून नागरिकांनी योजनांची माहिती घेतली पाहिजे. मागील तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध योजना राबविले जात आहेत. या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी तालुका व गाव पातळीवर क्लस्टर तयार करण्यात आले. केंद्र व राज्याच्या योजनांचा प्रत्यक्षात पात्र नागरिकांमध्ये पोहोचविण्यासाठी यंत्रणा तयार केली आहे. प्रचार रथाद्वारे नागरिकांच्या विविध शंकांचेही निरसन केले जाणार आहे.
उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळे म्हणाले, हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये पाठविण्यात येणार आहे. सामूहिक व व्यक्तिगत लाभाच्या योजनांची माहिती देवून कुठे अर्ज भरावा, त्याच्या अटी काय आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. शेती, आरोग्य, महिला, बालकल्याण, सिंचन, शेतीपूरक उद्योग, बेरोजगारीवर मात करणाऱ्या विविध योजनांचीही माहिती या चित्ररथाद्वारे दिली जाणार आहे. गावातील सामाजिक संस्था, महिला बचतगट, युवा संघटना आणि शेतकरी गटांसाठीही हा चित्ररथ उपयोगी ठरणार आहे. गावात आल्यानंतर ग्रामपंचायतने सहकार्य करावे, असेही उद्घाटनाप्रसंगी सांगण्यात आले.