रुग्णवाहिकेत उरकला शुभविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:25 AM2018-05-11T00:25:09+5:302018-05-11T00:25:09+5:30
रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्न रंगवू लागली. घरी आनंदाचे वातारण असताना पहाटेच्या सुमारास अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी दवाखान्यात हलवावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्न रंगवू लागली. घरी आनंदाचे वातारण असताना पहाटेच्या सुमारास अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी दवाखान्यात हलवावे लागले. तिथूनही तिला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र नियोजित लग्नासाठी वऱ्हाडी विवाहस्थळी हजर झाले. त्यामुळे अखेर नववधूला सलाईन लावूनच रुग्णवाहिकेने विवाहस्थळी आणून तिथेच विवाह उरकला.
पोंभूर्ण्यापासून सात किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथील भुजंगराव सोयाम यांची मुलगी वैशाली हिचा विवाह गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील सेवानिवृत्त शिक्षक दलपतराव आत्राम यांचा मुलगा गणेश यांच्याशी ९ मे रोजी होणार होता. मात्र आदल्या रात्री नववधू वैशालीची प्रकृती खालावली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. नववधूची प्रकृती खालावल्याचा निरोप वर पक्षाकडील मंडळींनाही देण्यात आला. मात्र वर पक्षाकडील मंडळीना भलत्याच शंकेने घेरल्यामुळे त्यांनी नियोजित वेळेवरच विवाह झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली.
नवरदेवाची वरात चिंतलधाब्यात दाखल झाली होती. दुसरीकडे नववधू वैशालीला डॉक्टरांनी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. वैशालीला घेऊन रुग्णवाहिका वरोऱ्यापर्यंत पोहचलीही. मात्र तिथून तिला रूग्णवाहिकेसह परत बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. रूग्णवाहिका वैशालीला घेऊन थेट लग्न मंडपात दाखल झाली. नवरी सलाईनसह रूग्णवाहिकेत व नवरदेव रूग्णवाहिकेच्या बाजुला उभा करून शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांसह हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती.