उत्कृष्ट महिला बचत गटांचा होणार गौरव
By Admin | Published: April 28, 2017 12:45 AM2017-04-28T00:45:19+5:302017-04-28T00:45:19+5:30
जिल्हयात बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी सिध्द झालेल्या महिला
सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांची उपस्थिती
चंद्रपूर : जिल्हयात बचत गटांच्या माध्यमातून हजारो महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी सिध्द झालेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या विविध महिला सक्षमीकरणाच्या यशकथांचा सत्कार सोहळा तसेच दुर्गम आदिवासी भागातील सरपंचांनी केलेल्या आगळयावेगळया कामांचा गुणगौरव कार्यक्रम २९ एप्रिल रोजी पोंभूर्णा येथे होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर उपस्थित राहणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २९ एप्रिल रोजी दुपारी १२.३० वाजता पोंभूर्णा येथे हा कार्यक्रम होत आहे. रोप वाटीका, शेळीपालन, पशुखाद्य विक्री, वनशेती, कृषी सेवा केंद्र, सेंद्रीय धान लागवड व उत्पादन करणे, अगरबत्ती उद्योग यामध्ये पोंभूर्णा तालुक्यातील ३५ गावांतील २६०० महिला सदस्य सक्रीय आहेत. दरवर्षी या महिला बचत गटांची वार्षिक सर्वसाधारण सभा होते. केलेल्या कामाचा आढावा व पुढील वर्षाच्या कामाचे नियोजन असे या सर्वसाधारण सभेचे स्वरुप असते.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने या सर्वसाधरण सभेचे साक्षीदार राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर हे होत आहे. त्यांच्या समक्ष बचत गटातील महिला व त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या आदिवासी भागातील वेगळे काम करणारे सरपंच यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी अनेकांची विशेष उपस्थिती राहणार ओह. (स्थानिक प्रतिनिधी)