सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:36 PM2024-11-25T13:36:36+5:302024-11-25T13:37:33+5:30

Chandrapur : खासगी बाजारपेठेत मिळतोय तोकडा दर

Betrayed by soybeans; Now the farmers are focused on cotton! | सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त !

Betrayed by soybeans; Now the farmers are focused on cotton!

प्रकाश काळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी :
खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्या तुलनेत सोयाबीनचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने कापसाची दरवाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.


दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अपेक्षेप्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. उलट खासगी बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत अल्प दर मिळाल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडले नाही. सोयाबीन सोबतच शेतकरी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना सात हजार रुपये एवढ्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही.


कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची आज वाईट अवस्था झाली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीला दिवसेंदिवस अवकळा आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके कापसाच्या उत्पादनात अग्रेसर मानले जातात. मात्र दिवसेंदिवस कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने आता नावालाच असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये तोकडा दर मिळत असल्याने या कापसाच्या दरात शेतकऱ्यांनी कापसावर केलेला उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. मात्र शासन शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. उत्पादनापेक्षा खर्च महाग झाल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत कापूस विकायला परवडत नाही. परंतु नाईलाजाने शेतकऱ्यांना सात हजार एवढ्या कवडीमोल भावात कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. मात्र याकडे अजूनही शासनाने लक्ष देऊ नये हे एक कोडेच आहे.


"शेतकरी दरवर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये एवढा तोकडा दर मिळत असल्याने कापूस कमी दरात विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शासनाने कापसाच्या दरात वाढ करावी." 
- श्रीधर जुनघरी, कापूस उत्पादक शेतकरी, गोवरी


"कापूस पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला तोकडा दर असल्याने कमी भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. कापूस वेचणीचे दर वाढल्याने कापसाची दरवाढ होणे अपेक्षित आहे." 
- चेतन बोभाटे, युवा शेतकरी


कापूस वेचणीची मजुरी महागली 
कापूस तोकड्या दरात शेतकऱ्यांना विकावा लागत असला तरी ८ ते ९ रुपये किलोप्रमाणे बाहेरील मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे. सध्या सर्वांकडे कापूस वेचणीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे. वेचणीचा खर्च महाग झाल्याने तसेच कापसाला बाजारपेठेत चांगला दर नसल्याने कापूस पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
 

Web Title: Betrayed by soybeans; Now the farmers are focused on cotton!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.