मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:45+5:302021-04-13T04:26:45+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवार तसेच रविवार विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय ...
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकारने शनिवार तसेच रविवार विकेंड लाॅकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या लाॅकडाऊनला सामान्य नागिरकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, मरण्यापेक्षा लाॅकडाऊन बरे, अशी प्रतिक्रिया सामान्य नागरिक सध्या व्यक्त करीत आहेत.
जिल्ह्यात रुग्णसंख्या चिंताजनक वाढत आहे. अनेकांना रुग्णालयात खाटाही मिळत नसल्याची स्थिती आहे. दरम्यान, लाॅकडाऊनला काही व्यावसायिकांचा विरोध आहे, तर लोकप्रतिनिधीही सावध भूमिका घेत आहे. लाॅकडाऊन झाल्यास सर्वांचेच नुकसान होणार असून, रोजीरोटीचा प्रश्न उभा ठाकणार आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी लाॅकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संस्थांनी हात पुढे करीत गरीब तसेच गरजूंना विविध प्रकारे मदत केली. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे या संस्थाही आता गरिबांच्या मदतीला येतील, असे चित्र नाही. लाॅकडाऊन केल्यास लहान व्यावसायिक, मजूर वर्गांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही उपस्थित होत आहे. मात्र गरीब तसेच सामान्य नागरिक कोरोनाने मरण्यापेक्षा अडचणीत दिवस काढण्याच्या मानसिकतेत आहे.
बाॅक्स
लाॅकडाऊनमध्ये सूट द्यावी
कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मात्र लाॅकडाऊन यावर पर्याय नाही. जर शासनाला लाॅकडाऊन करायचा असेल तर जरूर करावा. मात्र व्यावसायिकांना काही वेळासाठी का होईना व्यवसाय करण्यासाठी सूट द्यावी, अशी मागणीही काही व्यावसायिकांकडून केली जात आहे.
बाॅख्स
ग्रामीण भागातही दहशत
कोरोनाने आपले पाय घट्ट रोवणे सुरू केले आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण वाढत आहे. बहुतांश गावात आता कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. मागील वर्षी बहुतांश ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्ण नव्हते. मात्र यावर्षी परिस्थिती चिंताजनक असून, गावातही मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढत आहे.
बाॅक्स
काय म्हणतात नागरिक.......
मागील वर्षी लाॅकडाऊन करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे गरीब, गरजूंना दिलासा मिळाला. आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. अनेकांचा जीवही गेला आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी शासन जर लाॅकडाऊन करत असेल तर त्याचा फायदाच होणार आहे. काही नागरिकांना यामुळे फटका बसेल. मात्र संकटापुढे तो कमीच असेल.
-मनोहर मिस्त्री
चंद्रपूर
कोट
लाॅकडाऊन केल्यास सर्वांचेच मोठे नुकसान होणार आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत आहे. रुग्णालयात खाटा उपलब्ध नाही. उपचारासाठी धावाधाव होत आहे. आरोग्य प्रशासनावर आता ताण पडत आहे. अशास्थितीत लाॅकडाऊन केल्यास रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता आहे.
-रोहित ठाकूर
चंद्रपूर