पोंभुर्णाच्या व्हाईट हाऊसमधून जनतेची उत्तम सेवा व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:39+5:30
विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असताना जातीजातीमध्ये भेद निर्माण केला नाही. ७५ लक्ष रुपये खर्चून संताजी जगनाडे महाराजांच्या नावाने स्मारक सभागृह स्वरूपात निर्माण करण्यात येत असून शहीद बाबुराव शेडमाके यांच्या नावाने येथे सभागृहाकरिता जागेसहित ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : २०१५ पूर्वी पोंभुर्णा ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतरण झाल्यानंतर त्याची एक उत्तम वास्तू असावी, अशी इच्छा येथील सर्व नागरिकांची होती. आता सर्वांचे हे स्वप्न पूर्ण झाले असून अमेरिकेच्या व्हाईट हाऊसप्रमाणे दिसणाऱ्या या उत्कृष्ट वास्तुमधून नागरिकांच्या तक्रारी सोडवून त्यांची उत्तम सेवा केली जाईल, असा विश्वास राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
पोंभूर्णा नगरपंचायतीच्या कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कृष्णा सहारे, बांधकाम सभापती संतोष तांगडपल्लीवार, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष श्वेता वनकर, उपाध्यक्ष रजिया कुरेशी, गटनेते गजानन गोरंटीवार कार्यकारी अभियंता बुरांडे, मुख्याधिकारी विपीन मुदधा व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, पोंभुर्णा नगरपंचायतीने अवघ्या चार वर्षातच स्वच्छतेसोबतच अनेक क्षेत्रात आघाडी घेतली असून नगरपंचायतीमधील सर्व पदाधिकारी तसेच अधिकारी यांच्या समन्वयाने हे शक्य झाले. यातच देशाचा खरा जयजयकार आहे. या पोंभुर्णामध्ये विद्यार्थ्यांसाठी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय खेळाडूंसाठी उत्तम स्टेडियम उभारला आहे. बस स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तलावाचा सौंदर्यीकरण बंदिस्त गटारे यासाठी निधी उपलब्ध करून दिला. नाट्यगृहाचे बांधकाम, ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम, अटल बिहारी वाजपेयी इको पार्क, विश्रामगृह, पाणीपुरवठा योजना, सात आरओ मशीन, आयटीआयची इमारत, पोंभुर्णा एमआयडीसीला मान्यता मिळाली असून ही पोंभुर्ण्यासाठी वरदान ठरणार आहे. अगरबत्ती, मधुमक्षिकापालन, पोल्ट्रीउद्योग येथे सुरू केले आहे. या मतदारसंघातील ४०३ आयएसओ अंगणवाडी निर्माण झाल्या. भारताच्या सुपर कम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर यांनीसुद्धा जिल्ह्यातील विकास कामांचे कौतुक केले.
विकासाच्या दृष्टीकोनातून काम करत असताना जातीजातीमध्ये भेद निर्माण केला नाही. ७५ लक्ष रुपये खर्चून संताजी जगनाडे महाराजांच्या नावाने स्मारक सभागृह स्वरूपात निर्माण करण्यात येत असून शहीद बाबुराव शेडमाके यांच्या नावाने येथे सभागृहाकरिता जागेसहित ७५ लाखांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.
या क्षेत्रात विकासाची अनेक कामे करण्याची स्वप्न मनात बाळगून असून याकरिता जनतेचे सहकार्य आवश्यक आहे, अशी भावना ना. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.