चंद्रपुरात पुन्हा क्रिकेटवर सट्टा; एलसीबीने आवळल्या मुसक्या
By परिमल डोहणे | Updated: March 17, 2025 18:01 IST2025-03-17T17:59:48+5:302025-03-17T18:01:32+5:30
एकाला अटक : ४२ लाखांचा मुद्देमालासह तीन लाखांची रोकड जप्त

Betting on cricket again in Chandrapur; LCB arrested accused
परिमल डोहणे
चंद्रपूर : चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातील ऑनलाइन बेटिंग साइटवर सट्टा लावणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असताना १७ मार्च रोजी पुन्हा भारत व वेस्टइंडिज या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या अंशुल रामबाबू रॉय (२६ रा. म्हातारदेवी, घुग्घुस) याच्यावर कारवाई करून बेड्या ठोकल्या. सोमवारी केलेल्या या कारवाईत तब्बल ४२ लाख रुपयांच्या मुद्देमालासह नगदी तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पो.उपनि. विनोद भुरले, पो.उपनि. मधुकर सामलवार, पोउपनि सुनील गौरकार, पो.हवा. सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, मिलींद टेकाम आदींनी केली.
अशी केली कारवाई
१७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक घुग्घुस परिसरात गस्तीवर असताना म्हातारदेवी, घुग्घुस येथे अंशुल रामबाबू रॉय हा राहत्या घरी लिजेंड लिगच्या भारत व वेस्टइंडिज या क्रिकेट मॅचवर मोबाइलवर ऑनलाइन पद्धतीने सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने एलसीबीच्या पथकाने घरी धाड टाकली. या कारवाईत एक आय फोन, ३८ लाख रुपयांची ऑनलाइन जुगार आयडीसह ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल व तीन लाख रोकड जप्त करून अंशुल रॉयवर घुग्घुस पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.