सावधान! आता मंकीपॉक्स आजाराची धास्ती, आरोग्य यंत्रणा अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 03:14 PM2022-07-27T15:14:17+5:302022-07-27T15:15:30+5:30
प्रतिबंधासाठी उपाययोजना, सर्वेक्षणावर भर देण्याच्या सूचना जारी
चंद्रपूर : केरळमध्ये मंकीपॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.
मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. १९७० मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. मंकीपॉक्स हा आजार आर्थोपॉक्स व्हायरस या डीएनए विषाणूमुळे होतो. खारी व उंदरांत हा विषाणू आढळतो. आजाराचा कालावधी ५ ते २१ दिवसांपर्यंत असू शकतो. रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी हा अंगावर रॅश उठण्यापूर्वी १-२ दिवसांपासून त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.
मंकीपॉक्स आजाराची लक्षणे
मंकीपॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी २ ते ४ आठवड्यांत बरा होतो. लहान मुले किंवा इतर काही रुग्णांमध्ये गंभीर स्वरूप धारण करू शकतो. आजाराचा मृत्यूदर ३ ते ६ टक्के आहे. ताप, लसिका ग्रंथींना सूज (कानामागील, काखेतील व जांघेतील लसिका ग्रंथीना सूज येणे), डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे, खोकला ही लक्षणे दिसतात. मंकीपॉक्ससदृश इतर आजारामध्ये कांजण्या, नागीन, गोवर, सिफिलिस- दुसरी स्टेज, हॅन्ड, फूट माऊथ डिसीज आदींचा समावेश होतो.
असा होतो मंकीपॉक्सचा प्रसार
थेट शारीरिक संपर्क, लैंगिक संपर्क किंवा जखम, घावातील स्राव, संपर्कबाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळा बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेदेखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
हाही एक साथरोग
मंकपॉक्स सर्वेक्षणासाठी मंकीपॉक्सचा एक रुग्ण साथरोग उद्रेक आहे. त्यामुळे मंकीपॉक्स रुग्णांचे प्रयोगशाळेत नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे पाठविण्यात येतील. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण होईल. ग्रामीण रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग, मेडिसिन, बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर देण्यात येणार आहे.