ध्वनी प्रदूषण कराल तर खबरदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 12:16 AM2017-08-21T00:16:39+5:302017-08-21T00:17:10+5:30
आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा होईल, यावर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी भर दिला पाहीजे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आगामी गणेशोत्सव मंगलमय व ध्वनी प्रदूषण मुक्त साजरा होईल, यावर सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी भर दिला पाहीजे. ध्वनीप्रदूषणच्या बाबतीत उच्च न्यायालयाने सुद्धा निरीक्षक नेमलेले असून ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आहेत. या कायद्यानुसार जो कोणी ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करेल, त्याला पाच वर्ष शिक्षा किंवा तीन लाख रुपये दंडाची शिक्षा होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.
आगामी गणेशोत्सवाच्या निमित्त्याने चंद्रपूर पोलीस मुख्यालयात जिल्हा शांतता समिती तसेच जिल्ह्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक ड्रिल शेड पोलीस मुख्यालय येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
बैठकीला महापौर अंजली घोटेकर, पोलीस अधीक्षक नियती ठाकर, मनपा आयुक्त संजय काकडे, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक, धर्मदाय उपआयुक्त तसेच जिल्हा शांतता समितीचे सदस्य, जिल्ह्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
गणेश सभामंडपाच्या रोषणाईकरिता लावण्यात आलेल्या इलेक्ट्रीक वायरची जुळणी ही अतीशय थातूरमातूर स्वरूपात केलेली असते. इलेक्ट्रीक वायरची जुळणी अपघात होऊ नये, या दृष्टीणे योग्यप्रकारे करुन घ्यावी तसेच आयएसआय मार्क असलेले विद्युत उपकरणे वापरण्यास व शहरातील सिव्हील इलेक्ट्रीकल लाईनला स्पर्श होणार नाही, यादृष्टीने १५ फूटापेक्षा जास्त उंचीची गणेशमूर्ती किंवा मूर्ती विसर्जनाची सजावट नसावी, याबाबतही सर्व गणेश मंडळांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
सर्व गणेश मंडळांना उत्सवा दरम्यान मंगलमय भक्तीपर गीते लावण्याचे, तसेच पीओपी मूर्ती न वापरता इको फ्रेन्डली मूर्ती वापरुन जलचर प्राण्याचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. विसर्जन मार्गावर एकूण ३५ रुग्णालय आहेत. त्यामध्ये आपलेच कोणीतरी बांधव उपचार घेत असल्याची जाणीव ठेवून गणेश मिरवणूकीचा त्रास रुग्णांना होणार नाही, याची दक्षता प्रत्येक गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक ठाकर यांनी यावेळी केले. या बैठकीला जिल्हाभरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंडळाची नोंदणी व खर्चाचा ताळमेळ सादर करणे आवश्यक
बैठकीत माहिती देताना धर्मदाय आयुक्त यांनी सर्व गणेश मंडळाची नोंदणी असणे आवश्यक असून पदाधिकाºयांच्या सोयीसाठी शासनाने संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. त्यावर जाऊन मंडळानी गणपती मंडळाची नोंदणी करणे आवश्यक असून या वर्षी नोंदणी करतेवेळेस मंडळातील सदस्यांचे पॅन कार्ड नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व मंडळाची धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून तपासणी केली जाणार असून मंडळाच्या दस्तऐवजाची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. यामध्ये जे कोणतेही मंडळ परवानगी न घेतल्याचे आढळून आल्यास तसेच दस्ताऐवजामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्या मंडळावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. उत्सवा दरम्यान मंडळाची वर्गणी व करण्यात आलेला खर्च याबाबत अकाऊंट स्टेटमेन्ट अद्यावत असणे आवश्यक असून ते धर्मदाय आयुक्त येथे जमा करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्गणी मागताना जबरदस्ती नको
वर्गणी गोळा करताना कोणावरही जबरदस्ती व्हायला नको, याची काळजी प्रत्येक मंडळाने घ्यावी. वर्गणीबाबत कोणत्याही प्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल. त्याचप्रमाणे विसर्जनामध्ये एका मंडळाकडे तीन पेक्षा जास्त वाहनाची परवाणगी देण्यात येणार नाही. नियमांमध्ये व कायद्याच्या अमंलबजावणीमध्ये कोणताही भेदभाव मंडळाची प्रतिष्ठा पाहून केल्या जाणार नाही. प्रत्येक लहान मोठ्या गणेश मंडळानी कोणत्याही परिस्थितीत कायद्याचे व सामाजिक स्वास्थ्याचे उल्लंघन होणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी, असे पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी बैठकीत सांगितले.