विजेपासून सावधानता बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:19 AM2021-06-19T04:19:43+5:302021-06-19T04:19:43+5:30
चंद्रपूर : पावसाळ्यात वादळीवारा व अतिवृष्टीमुळे वीज खांब पडून तारा तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक ...
चंद्रपूर : पावसाळ्यात वादळीवारा व अतिवृष्टीमुळे वीज खांब पडून तारा तुटून किंवा शॉर्टसर्किटने दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा घरगुती वीज यंत्रणा, उपकरणांपासून सावधानता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुसळदार पाऊस आणि वादळीवारा यामुळे झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात, तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकतात. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीज प्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोबकळणाऱ्या तारांपासून सावध राहावे, त्यांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, तसेच अतिवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीज तारा, खांब रस्त्यांच्या बाजूचे फिडर पिलर, ट्रान्सफॉर्मरचे लोखंडी कुंपण, फ्यूजबॉक्स, तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपाचा स्विच बोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळणे सहज शक्य असते.
शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी असलेल्या महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावरील कॉल सेंटरवर याबाबत तक्रार दाखल करा. वीज सेवेच्या तक्रारीसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे.
पावसाळ्यात घरातील स्विच बोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी, घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्विच तत्काळ बंद करावा, विशेषत: टिनपत्राच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात, विजेच्या खांबाला किंवा स्टेला जनावरे बांधू नयेत, खांबास दुचाकी टेकवून ठेवू नये किंवा खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत, घरावरील डिश किंवा ॲन्टिना वीज तारांपासून दूर ठेवावेत, ओल्या कपड्यावर विजेची प्रेस फिरवू नये, विजेचे स्विच बोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.