सावधान ! सोशल मीडियावर फसव्या योजनांची लिंक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 01:27 PM2024-11-13T13:27:41+5:302024-11-13T13:29:14+5:30
नागरिकांची दिशाभूल : लिंक ओपन करणे महागात पडणार
दीपक साबणे
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसांत दृढ होऊन कामात होणारी दिरंगाई थांबविण्यासाठी, तसेच कामात पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय स्तरावरून अधिक भर दिला जात असला तरी अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा विपर्यास करून सोशल मीडियावर अनेक फसव्या योजनांची लिंक टाकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
मागील अनेक दिवसांपासून अनुदान योजनांच्या संकेतस्थळांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मोबाइल, लॅपटॉप, सौर पॅनल यासारखी आमिषे दाखविणाऱ्या फसव्या योजनांची लिंक पाठविली जात असून, त्यामुळे अनेक नागरिकांची दिशाभूल होत आहे.
या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक फसवणूक होत आहे. सध्या सोशल मीडियावर प्रधानमंत्री घरकुल योजना, तसेच प्रधानमंत्री सन्मान किसान योजना यामधील लाभार्थ्यांची यादी बघून घ्या म्हणून एक लिंक सोशल मीडियावर व्हायरल होऊन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ही लिंक ओपन करताच अनेकांचे मोबाइल हँग होत आहेत. याशिवाय काही व्यक्तींच्या मोबाइलमधून त्यांचा डेटा चोरीला जात आहे. त्यामुळे त्यांच्या बँक खात्याला धोका होण्याचे संकेत आहेत. शासकीय कार्यालयापासून तर ग्राम प्रशासनापर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, नागरिकांना कुठल्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी संगणकीकृत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून दस्तऐवजांची पूर्तता करावी लागते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या ज्या काही फसव्या योजनांच्या लिंक व्हायरल होत आहेत, त्या लिंक अगोदर सुरू करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर दोन ते तीन प्रश्नांतून अर्जदाराची मते सोशल मीडियाद्वारे जाणून घेतली जातात. त्यानंतर दहा मित्रांना या योजनांच्या माहितीची लिंक पाठविण्याची अट घातली जाते. मात्र, असे करूनही अर्जदाराला कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. उलट या फसव्या योजनांच्या माहितींना नागरिक बळी पडल्यामुळे त्यांचे नुकसान होते.
फसव्या लिंक दिसताच डिलिट करा
सध्या सोशल मीडियावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यादी, घरकुल योजना, मोबाइल, लॅपटॉप, तसेच आपला परिवार जोडा आणि अडीच लाख रुपये मिळवा, अशी माहिती देणारी लिंकसुद्धा व्हायरल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक सुरू न करता थेट डिलिट करून घ्याव्यात आणि अशा फसव्या लिंकपासून सावध असावे, असे आवाहन पोलिसांनीही केले आहे.
"आजकाल .apk एक्स्टेन्शन नावाच्या फाईल पाठवल्या जात आहेत. त्या फाइल इंस्टॉल करू नये. या फाइल इंस्टॉल करताच क्षणात मोबाइलचा ताबा फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराच्या ताब्यात जाऊन बँक खाते रिकामे होते. शिवाय मोबाइलमधील तुमचा खाजगी डेटाही चोरीला जाऊ शकतो. प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवर खात्रीशीर अॅप असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम किवा व्हॉटस्अॅप ग्रुपवर आलेल्या अश्शत Apk फॉरमॅटमधील फाइल असुरक्षित असतात. पडताळणी न झालेल्या लिंक ओपन करू नये."
- कांचन पांडे, ठाणेदार पोलिस स्टेशन, जिवती