उन्हापासून सावधान
By Admin | Published: March 31, 2017 12:46 AM2017-03-31T00:46:08+5:302017-03-31T00:46:08+5:30
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पुढील काही दिवस तीव्र उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.
! नागपूर वेधशाळेकडून सर्तकतेचा इशारा : दुपारी बाहेर पडू नका
चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना पुढील काही दिवस तीव्र उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. नागपूर वेध शाळेकडून यासंदर्भात सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून चंद्रपूर शहर व जिल्ह्याच्या काही भागात उष्णतेची लाट पसरली आहे. पुढील चार दिवस तापमानाचा आलेख चढता राहणार आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
दुपारच्या तीव्र उन्हात नागरिकांनी विशेषत: वृध्द व्यक्ती, लहान बालके, गरोदर माता व उन्हात काम करणाऱ्या कामगारांनी या काळात अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. चंद्रपूरमध्ये गेल्या वर्षी १७ ते १९ एप्रिल या काळात एकदा तर १५ ते २५ मे या काळात दुसऱ्यांदा उष्णतेची लाट पसरली होती. मात्र यावर्षी ४० च्यावर पारा मार्च महिन्यातच पोहचला असल्यामुळे नागरिकांनी उन्हापासून दूर राहणे योग्य आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा व महानगरपालिका आरोग्य यंत्रणेने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघात झालेल्या रुग्णांसाठी विशेष कक्ष उभारला असून यंत्रणा सज्ज आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
उन्ह लागल्याची लक्षणे
अचानक शरीरामध्ये अस्वस्थपणा जाणवणे, थकवा येणे, शरीर तापणे, डोकेदुखी वाढणे, मळमळ वाटणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास मनपा आरोग्य केंद्र किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने दाखल होऊन उपचार करावा. तसेच आकस्मिक परिस्थितीत १०८ या टोल फ्री क्रमांकावर संर्पक साधून आकस्मिक सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उन्हापासून रक्षणासाठी हे करा
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजेच नियमित अंतराने मोठ्या प्रमाणात पाणी प्यावे. सायंकाळी थंड पाण्याने आंघोळ करावी. ताक, आंब्याचे पन्ह, नाराळाचे पाणी मोठ्या प्रमाणात सेवन करावे. सैल व फिक्कट रंगाचे कपडे घालावे. थंड जागेत किंवा वातावरणात राहावे. दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात काम करण्याचे टाळावे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.