बेरोजगारांनो सावधान... डमी वेबसाइटद्वारे घातला जाऊ शकतो गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:49+5:302021-07-15T04:20:49+5:30
बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. अनेकजण जॅाब मिळवून देणाऱ्या ...
बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच कोरोनाने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे बेरोजगार नोकरीच्या शोधात आहेत. अनेकजण जॅाब मिळवून देणाऱ्या ऑनलाइन कंपनीकडे ॲप्लिकेशन केले आहे. ही बाब हेरून अनेक सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. अनेकजण मोबाइलवर किंवा मेलवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करतात. त्यांना आपली वैयक्तिक माहिती देतात. अनेकांना आज ना उद्या नोकरीसंदर्भात काही सूचना येईल, अशी भोळी आशा असते. परंतु, त्यांच्या खात्यातून पैसे गहाड केले जातात. मोबाइल क्रमांक बॅंक अकाउण्टशी कनेक्ट असल्याने अशांची फसवणूक होते. आपल्याकडे अशा घटना कमी असल्या तरी ही स्थिती चिंताजनक आहे. बहुतेकजण बदनामीच्या नावाखाली पोलिसात जाणे टाळतात. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नोकरीसंदर्भात कोणतीही लिंक किंवा मॅसेज आल्यास संपूर्ण खातरजमा करूनच माहिती द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
बॉक्स
अशी करा खातरजमा
छोटी किंवा मोठी कोणतीही खासगी कंपनी मुलाखत घेतल्याशिवाय केवळ माहिती दिल्याने नोकरीत देत नाही. विनामुलाखत कुणीच थेट नोकरीचे ऑफर लेटर मेलवर पाठवत नाही. त्यामुळे अशा ई-मेल्सना उत्तर देणे टाळावे.
कोणत्याही स्पर्धेत सहभागी झाल्याशिवाय कुणी सहज बक्षीस देत नाही. त्यामुळे अशा ई-मेल्सला उत्तर देणे टाळावे. नोकरी, कर्ज, बक्षीस असे मेसेज किंवा मेल आल्यास त्याची खातरजमा करूनच त्यांना रिप्लाय द्यावा.
बॅंकेकडून कधीही फोन, मॅसेज किंवा मेलद्वारे वैयक्तिक माहिती विचारली जात नाही. त्यामुळे अशा फोन, मेसेज किंवा मेलला उत्तर देणे टाळावे.
-------
कुठेही नोकरीसाठी अर्ज करताना संपूर्ण खातरजमा करावी. वर्क फ्रॉम होम, घरबसल्या पैसे कमवा आदी प्रकारच्या जाहिराती असल्यास त्यासंदर्भात संपूर्ण चौकशी करावी, शक्यतो त्यांच्या कार्यालयात जाऊन पाहणी करून कामाचे स्वरूप आदींबाबत संपूर्ण माहिती घ्यावी. कुणालाही वैयक्तिक माहिती देऊ नये, जर फसवणूक झाली असेल तर पोलिसांशी संपर्क करावा.
-निशिकांत रामटेके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सायबर सेल, चंद्रपूर