भद्रावतीच्या दीपकचा ‘आय एम सॉरी’ येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:17 PM2022-03-03T13:17:04+5:302022-03-03T13:23:57+5:30
दीपक भागवत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाट्य आणि टेलिव्हिजन जगताशी संबंधित शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि नंतर ते मुंबई मायानगरीत संघर्ष करू लागले. यात त्यांना यशही आले.
सचिन सरपटवार
भद्रावती (चंद्रपूर) : चित्रपटसृष्टीचे आकर्षण कुणाला नाही. आपल्या आयुष्याचा तो एक भाग आहे. मुंबई हे त्याचं केंद्र आहे. आपल्या भागातून खूप लोक मुंबईत जाऊन या क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघर्ष करतात. पण खूप कमी यशस्वी होतात व काहींनाच संधी मिळते. बहुतेकांना अभिनयाची आवड असते. पण सिनेमात करिअर करायचं तेही दिग्दर्शक म्हणून... यासाठी तर फार कमी लोक हिंमत करतात. भद्रावती येथील दीपक भागवत यांनी ही किमया साधली आहे.
भद्रावतीचे दीपक भागवत आज गेली पंचेवीस वर्षे मुंबईत राहून चित्रपट क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात राजगड येथील प्रकाश पाटील मारकवार यांनी निर्माता म्हणून काही मराठी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. पण कलात्मक योगदान, लेखक, संकलक आणि दिग्दर्शक म्हणून दीपक भागवत हे जिल्ह्यातील पहिलेच.
दीपक भागवत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून नाट्य आणि टेलिव्हिजन जगताशी संबंधित शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि नंतर ते मुंबई मायानगरीत संघर्ष करू लागले. यात त्यांना यशही आले. आता त्यांचा नवीन चित्रपट येतोय, चित्रपटाचं नाव आहे "आय एम सॉरी". हा चित्रपट या महिन्यातच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात फक्त मराठी नाही, तरी तमीळ आणि इंटरनॅशनल चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ कलाकारांचे काम प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. दीपक भागवत यांच्या दोन्ही चित्रपटांना सहायक दिग्दर्शक म्हणून भद्रावती शहरातील अमोल चालखुरे यांनी काम पाहिले आहे.
‘उत्तरायण’पासून सुरुवात
त्यांच्या करिअरची सुरुवात बिपिन नाडकर्णी यांचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ''उत्तरायण'' यात मुख्य सहायक दिग्दर्शक म्हणून झाली. दीपक भागवत यांचा लेखक आणि दिग्दर्शक म्हणून किल्लारी हा पहिला चित्रपट. जो २०१५ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट सई ताम्हणकर, हिंदी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले कलाकार जॅकी श्रॉफ, अनुराग शर्मा, अशा मोठ्या स्टार लोकांना घेऊन केला. मधल्या काळात त्यांनी लेखक म्हणून ‘मोहर’, ‘थोडं तुझं थोडं माझं’, ‘बाइकर्स अड्डा’ हे चित्रपट लिहिले. त्यात ''थोडं तुझं थोडं माझं'' या चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट स्पर्धेत उत्कृष्ट पटकथेसाठी नामांकन होतं. दीपक भागवत यांनी विदर्भातील अनेक कलाकारांना बरोबर घेऊन कामे केलेली आहेत.