विठू नामाच्या गजराने भद्रावती दुमदुमले
By admin | Published: July 18, 2016 01:46 AM2016-07-18T01:46:16+5:302016-07-18T01:46:16+5:30
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर देवस्थान समिती भद्रावतीच्या वतीने विठ्ठल मंदिरातून विठ्ठल-रूक्माईची पालखी
आकर्षक देखावे : विठ्ठल-रूक्माईची पालखी यात्रा व वृक्षदिंडी
भद्रावती : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर देवस्थान समिती भद्रावतीच्या वतीने विठ्ठल मंदिरातून विठ्ठल-रूक्माईची पालखी यात्रा व वृक्षदिंडी काढण्यात आली. या पालखी समवेश मराठी संताच्या वेशभूषेत आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते. पालखी यात्रेतील विठ्ठल नामाच्या गजराने भद्रावती दुमदुमली.
पालखीयात्रा व वृक्षदिंडीला विठ्ठल मंदिरापासून सुरूवात झाली. मुख्य रस्त्यावरून फिरवून विठ्ठल मंदिर येथे पालखी यात्रा व वृक्षदिंडीची सांगता झाली. शोभायात्रेत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी दिंडी, पताका, लेझीम नृत्यासह सहभागी झाले होते. भजनमंडळीचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
शोभायात्रेत ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ असा संदेश देणारे संत तुकारामाचे व पंढरीच्या पांडुरंगाचे देखावे मनवेधत होते. शोभायात्रेतील विठ्ठल-रूक्माईचा देखावा सर्वांना आकर्षित करून गेला. शुक्रवारला विठ्ठल-रूख्माईच्या मूर्तींची पूजा व अभिषेक करण्यात आला. रात्री हभप केशव खिरटकर यांचे किर्तन पार पडले. शनिवारी विठ्ठल-रूक्माईच्या पालखी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
शोबायात्रेत विठ्ठल देवस्थान समितीचे चंद्रकांत गुंडावार, ठाणेदार विलास निकम, विठ्ठल पारधे, वसंत लोणकर, दिवाकर लोणकर, प्राचार्य विनोद पांढरे, गोपाल ठेंगणे, अविनाश पाम्पदीवार, शोभायात्रेचे संयोजक राजेश्वर मामीडवार, सुरेश परसावार, बंडू दरेकर तसेच लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते.
(तालुका प्रतिनिधी)