भद्रावती बाजार समिती डबघाईस
By Admin | Published: January 22, 2015 12:52 AM2015-01-22T00:52:11+5:302015-01-22T00:52:11+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वत:च्या स्वार्थासाठी काम करीत असल्याने बाजार समिती डबघाईस आली आहे.
भद्रावती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव स्वत:च्या स्वार्थासाठी काम करीत असल्याने बाजार समिती डबघाईस आली आहे. ही बाजार समिती नजीकच्या बाजार समितीमध्ये विलीनीकरण करावी, असे पत्र पणन संचालकाने देवून सुद्धा विलीनीकरण न केल्यामुळे आमच्यावर उपासमारीची पाळी आल्याचा आरोप बाजार समितीत कार्यरत कर्मचाऱ्यांनी केला आहे.
भद्रावती बाजार समितीची स्थापना ५ फेब्रुवारी १९९१ ला झाली. भाड्याच्या जागेत सुरू झालेली ही बाजार समिती सुरुवातीच्या काही वर्षात चांगलीच प्रगतीपथावर होती. परंतु, येथे कार्यरत सचिव मधुकर पारखी यांनी बाजार समितीचे उत्पन्न आपल्या खिशात टाकण्याकरिता नियोजन पद्धतीने बाजार समितीला संपविले, असा आरोप कार्यरत कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम व कार्यालयीन जमा रक्कम सन २००४ ते २००८ या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या खाते पुस्तिकेत जमा करावयास पाहिजे होती. परंतु, ती अजूनपर्यंत जमा करण्यात आली नाही. काही कर्मचाऱ्यांची मुदत ठेवीची ८५ हजार ८०० एवढी रक्कम २००६ मध्ये प्रशासकीय कार्यकाळात सचिवाने परस्पर काढून टाकण्याचा आरोप सुद्धा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
फेब्रुवारी २०१४ पासून कर्मचाऱ्यांना वेतन देणे बंद असल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. आर्थिक तंगीमुळे मुलांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून आर्थिक संतुलन ढासळले आहे. अशा स्थितीत जीवीतास काही झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सचिव पारखी यांची राहील, असेही कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. कर्मचाऱ्यांनी याची तक्रार पणन संचालक पूणे, विभागीय सहनिबंधक नागपूर, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक निबंधक भद्रावती यांच्याकडे केली आहे. सचिवाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी सुचवूनही सचिवांनी वेतन दिले नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाजार समितीच्या मालकीची एकमेव असलेली किलोणी येथील जिनींगची जागा अत्यल्प किंमतीत खासगी खरेदीदारांना विकली. वास्तविक पाहता ही जागा कर्नाटका एम्टा कोळसा खाणीत गेली होती. या जागेबदल्यात कृउबा समितीने मुख्य मार्गावरील सात एकर जागा एम्टा कंपनीला मागितली असती तर शासनाकडून अनुदान प्राप्त करून बाजार समितीला पूर्नजीवन मिळाले असते. सचिव पारखी हे बाजार समितीच्या फायद्यापेक्षा स्वत:चा फायदा पाहत असल्याने आज आम्हाला भद्रावती सोडून वरोरा कृ.उ.बा. समितीमध्ये धान्य खरेदीचा व्यापार करावा लागत आहे.
- मनीष सारडा, संचालक व व्यापारी कृउबास भद्रावती
भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर्थिक स्त्रोत कमी झालेला आहे. बाजार समितीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कमी उत्पन्नामुळे होऊ शकत नाही. ही कृउबा समिती विलीनीकरण करण्यासंदर्भात पणन संचालकाचे पत्र प्राप्त झाले असून २३ जानेवारीला होणाऱ्या संचालकांच्या मासीक सभेत विलीनीकरणाचा ठराव घेण्यात येत आहे. बाजार समितीला एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत आणण्यास सचिव मधुकर पारखी जबाबदार आहे.
- आण्याजी लांबट
अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती, भद्रावती
बाजार समितीची आर्थिक स्थिती पाहता ही बाजार समिती वरोरा कृउबा समितीमध्ये विलीन करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझ्यासह माझ्या कर्मचाऱ्यांचा एक वर्षापासून वेतन न झाल्याने आमची सर्वांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. विलीनीकरणाला संचालक मंडळाचा विरोध आहे. विलीनीकरण केल्यास आपले पद संपुष्टात येतील, अशी त्यांना भिती आहे. केवळ आपले पदे टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक समस्येकडे त्यांचे लक्ष जात नाही, ही दुर्दैवी बाब आहे.
- मधुकर पारखी,
सचिव, कृउबास समिती भद्रावती
बाजार समितीची अशी अवस्था आणण्यास कारणीभूत असलेल्या सचिवाने परवानाधारक व विना परवानाधारक व्यापाऱ्यांकडून स्वत: सचिवच पैशाची वसुली करीत आहे. त्यामुळे समितीच्या उत्पन्नाला बाधा निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यातील मालाची खरेदी परस्पर होत असल्याने व मार्केटमध्ये माल येत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी समितीच्या बाजारातील खरेदी बंद केली. याकरिता बाजार समितीचे सचिव व संचालक मंडळ कारणीभूत आहे.
- मारोती गायकवाड,
व्यापारी, चंदनखेडा