भद्रावती नगरपरिषद राबविणार ‘वेंगुर्ले’ पॅटर्न
By admin | Published: July 17, 2016 12:35 AM2016-07-17T00:35:10+5:302016-07-17T00:35:10+5:30
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाले.
प्रशिक्षण पूर्ण : सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून कांडी कोळसा
भद्रावती : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे झाले. या शिबिरात महाराष्ट्रासह गोवा, अंदमान निकोबार येथील नगर परिषदांचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी उपस्थि होते. विदर्भातून फक्त भद्रावती नगरपरिषदेचे अध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नगरसेवक प्रा. संजय आसेकर, सभापती प्रमोद गेडाम, नगरसेवक प्रशांत झाडे उपस्थित होते. वेंगुर्ले न.प.च्या वेंगुर्ले पॅनर्टसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. हाच ‘वेंगुर्ले’ पॅटर्न भद्रावती न.प. राबविणार असल्याचे भद्रावतीचे नगरसेवक अनिल धानोरकर यांनी सांगिेतले.
प्रशिक्षणात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विद्युत निर्मिती करणे, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून जळाऊ कोळसा (कांडी कोळसा) तयार करणे, प्लास्टिक कचरा बारिक करून डांबरी रस्त्याच्या निर्मितीत त्याचा वापर करणे, घनकचऱ्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापनाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य पुरस्कारप्राप्त वेंगुर्ले न.प. ला भेट देण्यात आली.याठिकाणी खर्डा, कागद, वाळलेले पानापासून कांडी कोळसा तयार करण्यात येतो. त्यापासून न.प. ला आर्थिक फायदाही होतो. ओल्या कचऱ्यापासून मिथेन गॅस तयार करणे, त्यावर वीज निर्मितीसुद्धा केली जाते. प्लास्टिक बारिक करून डांबरात मिसळून रस्ते तयार करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला आहे. प्रशिक्षणादरम्यान संचालक मोदी सॉलिड वेस्टवर काम करणारे प्लॅनर पार्थिव सोनी व अन्य मार्गदर्शक उपस्थित होते.
(तालुका प्रतिनिधी)
प्लास्टिकमुक्त-हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ शहर, बायोगॅस प्रकल्प व हरित शहराच्या दिशेने भद्रावती न.प. ने पाऊल उचलले असून यासाठी ‘वेंगुर्ले’ पॅटर्न राबविण्यात येणार आहे. यासोबतच १ ते १५ आॅगस्टपर्यंत भद्रावती प्लास्टिकमुक्त शहर करणार आहोत. या पुढचे प्रशिक्षण भद्रावतीत घेण्याचा मानस आहे.
- अनिल धानोरकर,
नगराध्यक्ष, भद्रावती.