पोंभुर्णा येथील जनता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर भोंगळ कारभार
By admin | Published: February 22, 2016 01:18 AM2016-02-22T01:18:25+5:302016-02-22T01:18:25+5:30
येथील जनता विद्यालयात गुरुवारपासून इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू असुन परीक्षेदरम्यान येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीला सदर परीक्षा केंद्रावर भेट दिली.
पोंभुर्णा : येथील जनता विद्यालयात गुरुवारपासून इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू असुन परीक्षेदरम्यान येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीला सदर परीक्षा केंद्रावर भेट दिली. यावेळी शाळेमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असतानासुद्धा एका बेंचवर दोन विद्यार्थी परीक्षा देत असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते. हा प्रकार योग्य नसुन याबाबत २४ तासांच्या आत सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे आदेश संवर्ग विकास अधिकारी लोकरे यांनी जनता विद्यालयाच्या केंद्र प्रमुखाला दिले आहेत.
दक्षता समिती सदस्य म्हणून पोंभूर्णा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी आनंद लोकरे आणि प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीला जनता विद्यालयातील परीक्षा केंद्रावर भेट दिली. यावेळी मराठी विषयाचा पेपर सुरू होता. त्यांनी बैठक व्यवस्थेबाबत प्रत्यक्षात पाहणी केली असता ४ वर्गखोल्यांमध्ये एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसुन पेपर सोडविताना दिसुन आले. याबाबत केंद्रप्रमुख भोयर यांना विचारणा केली असता, त्यांनी जागा व बेंचेस अपुरे असल्याचे कारण पुढे केले. तसेच यासाठी नागपूर विभागीय मंडळाचे सहाय्यक सचिव श्रीराम चव्हाण यांचेकडून लेखी परवानगी घेतल्याचे सांगितले. याबाबत लोकरे यांनी दुरध्वनीवरून चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचेशी संपर्क होवू शकला नाही. त्यानंतर त्यांनी विभागीय सचिव सेवाकर दुपारे यांच्याशी मोबाईलद््वारे संपर्क साधला असता अशी कोणतीही परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगीतले. बैठक व्यवस्थेची नियोजन करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. परंतु मुख्याध्यापक यावेळी उपस्थित नसल्याने त्यांच्याशी संपर्क होवू शकला नसल्याचे लोकरे यांनी सांगितले.
सदर विद्यालयामध्ये पुरेशी जागा व बेंचेस उपलब्ध असतानासुद्धा केवळ स्वत:च्या मर्जीने एका बेंचवर दोन-दोन विद्यार्थी बसवित असल्याने गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर निश्चितच परिणाम होणार असल्याची भीती पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. दिसुन येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत २४ तासांच्या आत संबंधित केंद्र प्रमुखांकडून स्पष्टीकरण मागितले असुन ते आपल्याकडे प्राप्त न केल्यास वरिष्ठांकडे याबाबत कार्यवाहीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)