निधीअभावी ३० वर्षांपासून रखडले भेंडारा, डोंगरगाव व सोनापूर टोमटा तीन सिंचन प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:21 AM2021-06-06T04:21:37+5:302021-06-06T04:21:37+5:30
राजुरा : दुर्गम भाग असलेल्या राजुरा तालुक्यात भेंडारा मध्यम प्रकल्पाला १९९० व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला १९७७ मध्ये तर गोंडपिपरी ...
राजुरा : दुर्गम भाग असलेल्या राजुरा तालुक्यात भेंडारा मध्यम प्रकल्पाला १९९० व डोंगरगाव मध्यम प्रकल्पाला १९७७ मध्ये तर गोंडपिपरी तालुक्यातील सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजनेला १९९१ मध्ये मंजुरी मिळाली. जवळपास ३० वर्षे पूर्ण होऊनही प्रकल्पाची कामे पूर्णत्वास आलेली नाहीत. शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या या प्रकल्पांची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मुंबई येथे भेट घेऊन केली आहे, अशी माहिती राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली.
बाॅक्स
सिंचन सुविधेअभावी शेती पावसावरच
येथे सिंचन सुविधेअभावी स्थानिक शेतकऱ्यांना निसर्गाच्या पावसावर अवलंबून शेती करावी लागते. अनेकदा नापिकीला सामोरे जावे लागते. उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही. शेतकऱ्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ३० वर्षांपासून प्रकल्पाचे पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रति असंतोष आहे. भेंडारा व डोंगरगाव प्रकल्पाची बरीचशी कामे अपूर्ण आहेत. सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजनेच्या वितरण व्यवस्था कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. निधीअभावी रखडलेल्या भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापूर टोमटा उपसा सिंचन योजना या प्रकल्पाची कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटींच्या निधीची नितांत गरज आहे. ही बाब आमदार धोटे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली.
कोट
भेंडारा मध्यम प्रकल्प, डोंगरगाव मध्यम प्रकल्प व सोनापूर टोमटा हे तिन्ही प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाल्यास क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सिंचन सुविधा उपलब्ध होतील. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी होतील. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. यासाठी या तिन्ही प्रकल्पांच्या कामांना प्राधान्याने युद्धपातळीवर पूर्ण करण्याची गरज आहे. याच अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली.
- सुभाष धोटे, आमदार, राजुरा मतदार संघ.