भीमा कोरेगाव दगडफेकीचे जिल्ह्यात पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:47 PM2018-01-02T23:47:54+5:302018-01-02T23:48:25+5:30
भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या कार्यक्र्रमासाठी एकत्र जमलेल्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या कार्यक्र्रमासाठी एकत्र जमलेल्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला. याचे पडसाद मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. मूल, सावली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चंद्रपूर, भद्रावती येथे रॅली काढून घटनेचा निषेध करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील विविध गावात बौध्द अनुयायांनी निषेध नोंदवित प्रशासनाला निवेदन सादर केले.
मूल येथील बौद्ध संघटनांनी निषेध नोंदवत कडकडीत बंद पाडण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मूल शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. भिमा कोरेगाव येथे काही समाजकंटकांनी दगडफेक व जाळपोळ करून चांगल्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध नोंदवित मूल येथील बौद्ध बांधवांनी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मूलसोबतच सावली शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. हल्ला करणाºया आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. येत्या पाच दिवसात हल्लेखोर समाजकंटकांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून सर्व आंबेडकरी अनुयायांतर्फे देण्यात आला. बंदच्या आवाहनाला सावलीतही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात हिरालाल दुधे, यशवंत डोहणे, जे.जे. नगारे, प्रमोद गेडाम, उत्तम गेडाम, उदय गडकरी यांचा प्रामुख्याने समावेश होता. सदर बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शांततेत बंद पाळण्यात आला. परिस्थितीवर ठाणेदार स्वप्नील धुळे व सहकारी लक्ष ठेवून होते.
भद्रावतीत आज बंद
दरम्यान, भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी ३ जानेवारीला भद्रावती बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
बल्लारपुरात पोलिसांची शांतता सभा
भिमा कोरेगावच्या घटनेचे चंद्रपूर जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागल्याने बल्लारपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व जनतेला शांतता व संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, तहसीलदार विकास अहीर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, आंबेडकरी अनुयायी, व्यापारी, विविध संस्था व सामाजिक, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपुरात निषेध
भीमा कोरेगाव येथील घटनेचा काँग्रेस कमिटीनेही निषेध केला आहे. चंद्रपूर जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, शालिनी भगत, कुणाल रामटेके, मितीन भागवत, कल्याण सौदारी, सुरज गावंडे आदी उपस्थित होते. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, सचिव धीरज बांबोळे, राजू किर्तक, धीरज तेलंग, रामजी जुनघरे आदी उपस्थित होते.
भद्रावती येथे निदर्शने
भद्रावती येथील भारिप बहुजन महासंघाच्या वतीने भिमा कोरेगाव घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी निदर्शनेही देण्यात आली. त्यानंतर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले. गृहमंत्रालय मुख्यमंत्री सांभाळत असल्याने त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास भारिप बहुजन महासंघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा संघटक कपूर दुपारे, तालुका उपाध्यक्ष विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर, असित सुर्यवंशी, संदीप चटपकर, संदीप जुमडे, राहुल साखरे, अमर कांबळे, प्रितम मेश्राम, संदीप इंगोले, विक्की खडसे, प्रतिक दारवेकर, आनंद मेश्राम, राहुल खडसे, आनंद इंगळे, शेरू साव, सुरज शेंडे, विजय पाटील आदी उपस्थित होते.
बुधवारी चंद्रपूर बंदचे आवाहन
भिमा कोरेगाव हल्ल्यातील सर्व आरोपींना तत्काळ पकडण्यात यावे, या कटामागील सूत्रधार कोण, हे शोधून त्यालाही अटक करण्यात यावी, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ३ जानेवारी रोजी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या अनुषंगाने चंद्रपुरात मंगळवारी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे भवनात तातडीची बैठक घेण्यात आली. यात ३ जानेवारीला चंद्रपूर बंदचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत व्ही.डी. मेश्राम, खुशाल तेलंग, बाळू खोब्रागडे, देशक खोब्रागडे, बंडू नगराळे, स्नेहल रामटेके, अॅड. सत्यविजय उराडे, अंकूश वाघमारे व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.