दीक्षाभूमीवर उसळणार भीमसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 11:36 PM2017-10-15T23:36:13+5:302017-10-15T23:36:24+5:30
येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा रविवारपासून सुरू झाला आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात.
संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळा रविवारपासून सुरू झाला आहे. या सोहळ्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. रविवारी सायंकाळी या सोहळ्याचे उद्घाटन झाले असून सोमवारी दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध भागातून बौद्ध बांधव चंद्रपुरात दाखल झाल्याने येथे भीमसागर पाहायला मिळणार आहे.
अनुप्रवर्तन सोहळ्यासाठी दीक्षाभूमीचा परिसर बुक स्टॉल, कॅसेट्स स्टॉल, लहाण मुलांचे खेळण्याचे दुकान, महामानवाचे फोटो स्टॉल, बाबासाहेबांच्या मूर्ती विक्रीचे स्टॉल, सिध्दार्थ गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे बॅच व लॉकेटचे स्टॉल, भोजणालयाचे स्टॉल, स्वागत स्टॉलने चोहोबाजुनी गजबजलेला आहे. दूरवरून येणाºया अनुयायामध्ये एकप्रकारे परिवर्तनाचे विचार दिसत असून त्यांच्या बोलण्यात आनंदोत्सव साजरा होताना दिसत होता. वरोरा नाका चौकात तसेच आजूबाजूला विविध सामाजिक संघटना व विविध राजकिय पक्षाकडून मोठमोठे स्वागताचे बॅनर लागले असून परिसर सजून आहे. शासकीय विभाग, विविध सामाजीक संघटना व राजीकय पक्षाने भोजणाची व्यवस्था केली आहे.
तत्काळ आरोग्य सेवा व पोलीस बंदोबस्त
दीक्षाभूमीवर येणाºया अनुयायांची संख्या मोठी असल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खासकरून उड्डाणपुलाखाली पोलीस चौकी लावण्यात आली आहे. तसेच आरोग्य विभागामार्फ त तत्काळ उपचारासाठी महानगर पालीकेकडून रूग्णवाहिका व्यवस्था केली आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची सोय महापालिकेने केली आहे.
१६ आॅक्टोबरला चंद्रपूर दीक्षाभूमीवर ऐतिहासिक धम्मक्रांती घडली होती. त्यामुळे विदर्भातून अनेक बौद्ध बांधव डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीने पावन झालेल्या दीक्षाभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांनी या ठिकाणी दिलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळे जीवनात अमूलाग्र बदल झाला आहे.
-वैशाली दुर्योधन, चंद्रपूर
आपण चंद्रपूर येथे दरवर्षी येत असतो. वर्षातला एकदा येणारा हा उत्सव असून माझे विचार मला येथे घेऊन येतात.
-आत्माराम रामटेके,
किरमीरी, गोंडपिपरी.
माझ्या दोन दिवसाच्या मजुरीपेक्षा मला डॉ. आंबेडकर यांचे विचार ऐकायचे असतात. यासाठी मी चंद्रपूर येथे आलो आहे.
-विशाल दुपारे,
धोपटाळा, राजूरा.
१९५६ ला ज्या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली, त्याप्रसंगीचा मी साक्षीदार आहे. दरवर्षी मी नागपूरला जात होतो. परंतु आर्थिक अडचण असल्याने यावर्षी चंद्रपूरला आलो.
-रामाजी थूल
तिगाव, जि.वर्धा
दरवर्षी मी ठरल्याप्रमाणे नागपूर आणि चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी जात असतो. डॉ. आंबेडकरांचे विचार माझ्या मनात रूजले असून त्यांच्या विचाराने मला प्रेरणा मिळत असते.
-उद्धव नंदेश्वर,
पेंढरी, सिंदेवाही .
नवनवीन ग्रंथ व पुस्तके उपलब्ध
दीक्षाभूमी परिसरात नवनवीन ग्रंथ व पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असून जवळपास ५० ते ६० पुस्तकांचे स्टॉल लागले आहेत. पुस्तके व ग्रंथ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून येत असून नवीन पुस्तके घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. यावर्षी आलेल्या नवीन पुस्तकांत आरक्षण भीक नाही, प्रतिनिधीत्व, ईव्हिएम घोटाळा एक षडयंत्र, रूपया पुढील समस्या, करकरेंना कोणी व का मारले, खरा राष्ट्रपिता कोण ? पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी, मुलांसाठी धम्मपद, हिंदू धर्माचे कोडे, तसेच उत्तम कांबळे लिखीत नविन पुस्तके उपलब्ध आहेत.