समृध्द किसान योजनेचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:20 AM2021-07-10T04:20:22+5:302021-07-10T04:20:22+5:30
घोसरी : पोंभूर्णा तालुक्यातील समृध्द किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीचे बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी करोडो रुपये खर्ची ...
घोसरी : पोंभूर्णा तालुक्यातील समृध्द किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीचे बांधकाम हाती घेण्यात आले. यासाठी करोडो रुपये खर्ची करण्यात येत आहेत. परंतु बांधकाम निकृष्ट असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असल्याने टाटा ट्रस्टचा कारभार चव्हाट्यावर आल्याचे निदर्शनास येत आहे.
टाटा ट्रस्ट समृध्द किसान योजनेअंतर्गत नवेगाव मोरे येथील लाभार्थी प्रवीण रावजी झाडे, बंडू लटारू अर्जुनकर, शांता रावजी झाडे, लटारू दशरथ अर्जुनकर या शेतकऱ्यांच्या विहिरीचे २०२० व एप्रिल २०२१ मध्ये खोदकाम करण्यात आले. या योजनेतील विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्याचे कंत्राट पल्लवी टेडर्स, देवाडाला दिले आहे. अंदाजपत्रकानुसार विहिरीचे बांधकाम ४० फूट खोल व २० फूट गोल घेरा अशाप्रकारे करावयाचे असताना, कंत्राटदाराने अंदाजपत्रकाला बगल दिल्याची शेतकऱ्यांनी लेखी तक्रार केलेली आहे.
बांधकाम पूर्ण न झाल्याने विहिरीतील गाळ उपसा करुन नवीन बांधकाम करणे, विहिरीला पाणी न लागल्यास इन वेल बोअरिंग अपेक्षित होते. परंतु कंत्राटदाराने ते न करता काम पूर्ण झाल्याची बतावणी करून देयकाच्या कागदपत्रावर सही-अंगठे करवून घेण्याचा तगादा लावत असल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत नमूद केलेले आहे.
विशेषतः खोदकाम करताना लागणारी सर्व खर्च ब्लास्टिंग, वाटरिंग, यंत्राचे भाडे, मजूर खर्च नियोजित केलेले असून, शेतकऱ्यांना कोणताही खर्च करावयाचा नसताना हा कंत्राटदार एका लाभार्थी शेतकऱ्यांकडून १० हजार खर्च करवून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मौका चौकशी करून ठेकेदाराला टाटा ट्रस्ट कार्यालयातून देण्यात आलेले बिल अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केलेली आहे.
कोट
विहिरीचे खोदकाम व बांधकाम करताना कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार काम केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधितास बिलाची पूर्ण रक्कम अदा न करता मोजमापानुसारच रक्कम देण्यात येईल.
- अमित गोवर्धन, तालुका समन्वयक, टाटा ट्रस्ट प्रकल्प, पोंभूर्णा.