बांधकाम सुरू असलेला पूल पुरामुळे भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:09 PM2019-07-02T22:09:59+5:302019-07-02T22:10:21+5:30
दोन नाल्यांचा संगमातून उगम पावलेल्या धाबा ते किरमिरी नाल्यावरील पुलाचे बांधकाम भर पावसात सुरू असताना पुरामुळे भुईसपाट झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : दोन नाल्यांचा संगमातून उगम पावलेल्या धाबा ते किरमिरी नाल्यावरील पुलाचे बांधकाम भर पावसात सुरू असताना पुरामुळे भुईसपाट झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी गावाला जाण्यासाठी धाबा ते किरमीरी मार्गावर नाला आहे. धाबा गावाला वेढलेल्या दोन नाल्याचा संगमातून किरमीरी नाल्याचा उदय झाला. नाल्याचा पात्राचा विस्तार असल्याने पावसाळ्यात नदीपात्रासारखा दूथळी भरून वाहतो. पुलाअभावी नागरिकांची कोंडी होत असल्याने सहा वर्षांनतर बांधकामाला मंजुरी मिळाली. मात्र शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने नाल्याला पूर आला. या पुरामुळे बांधकाम वाहून गेले.
पहिल्याच पावसात रस्ता खचला
शंकरपूर : शंकरपूर-जवरबोडी मार्गावर गोसेखुर्द नहरावर बांधलेल्या पुलावरील रस्ता पहिल्याच पावसात खचल्याने कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले आहे. जवराबोडी येथून गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचा डावा कालवा राज्य मार्गावरून जातो. गोसेखुर्द पाटबंधारे विभागाने कंत्राटदाराकडून यंदा पुलाचे बांधकाम पूर्ण केले. बांधकामाला महिना पूर्ण झाला आहे. सोमवारी पुलासमोरील रस्ता खचल्याने बसेस बंद ठेवण्यात आल्या. जवराबोडी, साठगाव व हिवरा येथील विद्यार्थी शंकरपूर येथे येतात. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी पं. स. सदस्य रोशन ढोक यांनी केली आहे.