बिबी ग्रामपंचायत बनणार ‘मॉडेल व्हिलेज’
By admin | Published: April 3, 2017 01:55 AM2017-04-03T01:55:02+5:302017-04-03T01:55:02+5:30
बिबी ग्रामपंचायतची विकासाकडे जोरदार वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विकासाचे काम करण्याचा उत्साह आहे.
धनंजय साळवे : ग्रामपंचायतने राबविले विविध कल्याणकारी उपक्रम
कोरपना : बिबी ग्रामपंचायतची विकासाकडे जोरदार वाटचाल सुरु असून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये विकासाचे काम करण्याचा उत्साह आहे. त्यामुळे बिबी ग्रामपंचायत लवकरच ‘मॉडेल व्हिलेज’ बनणार, असा विश्वास कोरपना पंचायत समितीचे सहायक संवर्ग विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी व्यक्त केला.
नुकतीच त्यांनी ग्रामपंचायत बिबी येथे भेट देऊन सरपंच मंगलदास गेडाम, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी अरुण वाकुडकर व ग्रामपंचायत सदस्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी गावामध्ये सुरु असलेल्या विकास कामांची माहिती घेतली. गावाच्या विकासाचा वेग पाहून धनंजय साळवे यांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या आठ महिन्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गटग्रामपंचायतमध्ये समाविष्ठ गावातील १५ आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत एमएस-सीआयटी प्रशिक्षण, १५ विद्यार्थ्यांना मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण व परवाना, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन (बु.), धामणगाव व नैतामगुडा या शाळांना संगणक संच, गावातील मुख्य मार्गावर वृक्षारोपण, मनरेगाच्या माध्यमातून ६० शोषखड्डे, ८० एल.ई.डी. बल्ब, अल्ट्राटेक सिमेंट विलफेअर फाऊंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने गावातील लोकांना शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम तसेच विविध रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, गावातील लोकांना विविध ग्रामसभाविषयक माहिती, शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी स्पीकरच्या माध्यमातून दिवंडी दिली जाते. गटग्रामपंचायतीमधील बिबी, धामणगाव, आसन (बु.), नैतामगुडा व गेडामगुडा या पाचही जिल्हा परिषद शाळांना एक वर्गखोली डिजिटल करण्यासाठी एल.ई.डी. टी.व्ही. व इतर साहित्य देण्यात आले. अशाप्रकारची अनेक महत्त्वपूर्ण कामे अल्पावधीत झाल्याने गावाचा विकासदर समाधानकारक असल्याचेही सहायक संवर्ग विकास अधिकारी साळवे यांनी म्हटले.
बेसलाईन सर्व्हेनुसार गाव हागणदारीमुक्त झाले असून कचराव्यवस्थापन, जलव्यवस्थापन, पांदण रस्ते, स्मशानभूमी व कब्रस्थानचा विकास अशा अनेक समस्या सोडविणे ग्रामपंचायत समोरील मोठे आव्हान आहे. ग्रामपंचायतला पेसा निधी, चौदावा वित्त आयोग, सामान्य निधी या निधीच्या माध्यमातून नियमित कामे होत असले तरी े पाठपुरावा करून समस्या पूर्ण करण्यास मदत करू असे आश्वासन धनंजय साळवे यांनी आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)
एका शाळेला आय.एस.ओ. मानांकन
गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेली गेडामगुडा येथील जिल्हा परिषद शाळेला आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे. बिबी येथील जिल्हा परिषद शाळेचे आय.एस.ओ. साठी नामांकन झाले आहे. लवकरच आय.एस.ओ. मानांकन प्राप्त करणार असल्याचे मुख्याध्यापिका साधना वाढी यांनी सांगितले.
२०११ च्या लोकसंख्येनुसार बिबी ग्रामपंचायतची लोकसंख्या ४ हािर ४४४ असून हल्लीची लोकसंख्या ७ हजारांच्या जवळपास आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेता ग्रामपंचायतला मिळणारा निधी अपुरा पडत आहे. मात्र शासनाकडे पाठपुरावा करून शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून निधी खेचून आणण्यात आम्हाला यश मिळत आहे. बिबी ग्रामपंचायतची आदर्श गावाकडे वाटचाल सुरु आहे.
-प्रा. आशिष देरकर,
उपसरपंच ग्रा.पं.बिबी
स्वस्त दारात शुद्ध व थंड पाणी
अल्ट्राटेक सिमेंट विलफेअर फाऊंडेशन व ग्रामपंचायतच्या वतीने पेसा निधीअंतर्गत गावातील लोकांसाठी शुद्ध व थंड पाण्याचे एटीएम सुरु करण्यात आले असून अल्क्प रकमेमध्ये पुरवठा होत आहे. ५ रुपयात लोकांना २० लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे.