स्वच्छतेचा संदेश देत दिल्लीपर्यंत सायकलस्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 10:40 PM2019-02-13T22:40:38+5:302019-02-13T22:41:13+5:30
देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी नागरिक मुख्यत: रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. मात्र भद्रावती तालुक्यातील चोरा येथील ऋषी बांदूरकर या ३५ वर्षीय युवकाने देशाचे पंतप्रधान यांना भेटण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश, जल, वृक्ष संवर्धन आणि भारत जोडो या अभियानाचा संदेश देण्यासाठी इंधन वाहनाचा उपयोग न करता त्यांनी भद्रावती येथील चोरा ते दिल्लीपर्यंत हा टप्पा चक्क सायकलने गाठला. एक महिना दोन दिवसांचा एकट्याने प्रवास करून भद्रावती शहरात येताच त्यांच्यावर स्वागताचा वर्षाव करण्यात आला.
विनायक येसेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : देशाची राजधानी दिल्लीला जाण्यासाठी नागरिक मुख्यत: रेल्वे किंवा विमानाने प्रवास करीत असतात. मात्र भद्रावती तालुक्यातील चोरा येथील ऋषी बांदूरकर या ३५ वर्षीय युवकाने देशाचे पंतप्रधान यांना भेटण्यासाठी तसेच स्वच्छतेचा संदेश, जल, वृक्ष संवर्धन आणि भारत जोडो या अभियानाचा संदेश देण्यासाठी इंधन वाहनाचा उपयोग न करता त्यांनी भद्रावती येथील चोरा ते दिल्लीपर्यंत हा टप्पा चक्क सायकलने गाठला. एक महिना दोन दिवसांचा एकट्याने प्रवास करून भद्रावती शहरात येताच त्यांच्यावर स्वागताचा वर्षाव करण्यात आला.
ऋषी बांदूरकर याचे दिल्लीला सायकलने जाण्याचे पूर्वीपासूनच स्वप्न होते. त्याने ७ जानेवारीला सायकलवर पर्यावरणाचे फलक व तिरंगा लावून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. चंद्रपूरवरून राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याच्या सायकल स्वारीला हिरवी झेंडी दाखविली होती. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, यांची भेट घेतल्यानंतर ऋषी याची दिल्ली स्वारीला सुरूवात झाली. बैतूल मार्गे, भोपाळ, हरियाणा दिल्ली असा प्रवास करून २२ जानेवारीला तो दिल्ली येथे पोहचला. २६ जानेवारीला गणराज्य दिनाच्या कार्यक्रमासाठी लाल किल्ल्यावरील कार्यक्रमालासुध्दा त्याने उपस्थिती दर्शविली. दिल्ली येथे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांची भेट घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची भेट घेता आली नाही. आठ दिवसांच्या दिल्ली प्रवासानंतर तो ३१ जानेवारीला दिल्लीवरून परतीच्या प्रवासाकरिता निघाला.
ग्वालियर मार्गे झाशी येथे आला. माजी मंत्री प्रदीप जैन यांनी तिथे त्याचा सत्कार केला. ८ फेब्रुवारीला नागपूर येथे आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांनतर ९ जानेवारीला तो भद्रावती येथे पोहचला. चोरा येथे पोहचताच त्याचे स्वागत करण्यात आले. चोरा येथील शिंदे महाविद्यालयाचा तो माजी विद्यार्थी असल्याने माजी आमदार निळकंठराव शिंदे यांनीसुध्दा त्याचा सत्कार केला.
यापूर्वीसुध्दा मी एकट्यानेच महाराष्ट्र दर्शन सायकलनेच पूर्ण केले होते. वृक्ष संवर्धन, स्वच्छता अभियान, भारत जोडो या अभियानाची देशात पूर्णपणे जागृती व्हावी, यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सायकल स्वारी केली.
- ऋषी बांदुरकर