बडे दारू तस्कर असणार ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 11:08 PM2018-08-01T23:08:26+5:302018-08-01T23:09:02+5:30
दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी छोट्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना दारू पुरवठा करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी माहिती नवे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारू येत आहे. या वस्तुस्थितीला नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारूबंदी असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या दारूचा व्यवसाय सुरू आहे. हा व्यवसाय बंद करण्यासाठी छोट्या दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांना दारू पुरवठा करणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे, अशी माहिती नवे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारू येत आहे. या वस्तुस्थितीला नाकारता येत नाही.
जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध दारू व्यवसायात गुंतलेल्या लहान लोकांना लक्ष्य करण्यापेक्षा हा व्यवसाय चालविणाºया बड्या व्यापाऱ्यांची माहिती गोळा करणे सुरू आहे. जिल्ह्यात दारूबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी रूपरेखा तयार करण्यात येत आहे, असे सांगितले.
डॉ. रेड्डी पुढे म्हणाले, ठाणे, रायगड आणि गडचिरोली जिल्ह्यात काम केल्यानंतर चंद्रपुरात पहिल्यांदाच आलो आहे. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी आव्हाने व समस्या असतात. येथे रूजू झाल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींनी भेटी घेतल्या. त्यांच्या मागण्यांवरूनही जिल्ह्यातील समस्यांचा अंदाज आला, असे ते म्हणाले.
वाहतुकीची समस्या गंभीर
अनेक लोकांशी भेटल्यानंतर चंद्रपूर शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असल्याचे लक्षात आले. येथे पार्किंग झोनची कमी आहे. ही समस्या सोडवण्याच्या दृष्टीने सर्व बाजूने प्रयत्न केले जाणार आहे. स्थानिक आॅटो चालकांकडून नियम पालन केले जातील, यासाठी प्रयत्न केले जाईल.
गडचिरोलीचे कार्य आव्हानात्मक
डॉ. रेड्डी यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून सेवा दिली. हा कार्यकाळ आव्हानात्मक होता. नक्षल विरोधी कारवाई अंतर्गत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यात मनुष्यबळ कमी आहे. अधिकाºयांचीही अनेक पदे रिक्त आहेत. जिल्ह्यातील दोन-तीन पोलीस ठाण्यात केवळ एक अधिकारी कारभार पाहत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन कार्यतत्पर करणार असल्याचेही डॉ. रेड्डी यांनी यावेळी सांगितले.