महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक डोंगरगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:50 PM2018-01-20T23:50:22+5:302018-01-20T23:50:49+5:30
बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे असून जिल्ह्याचा तेजस्वी इतिहास बृहदाश्यमयुगीन कालखंडापर्यंत नेण्यासाठी हा स्मारक सबळ पुरावा आहे.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा एकाश्म स्मारक नागभीड तालुक्यातील डोंगरगाव (बुद्रुक) येथे असून जिल्ह्याचा तेजस्वी इतिहास बृहदाश्यमयुगीन कालखंडापर्यंत नेण्यासाठी हा स्मारक सबळ पुरावा आहे. शिवाय, अशा प्रकारचे सुमारे ३० स्मारक या परिसरात आहेत, असा दावा युवा अभ्यासक अमित भगत यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना केला. भगत हे मुंबई येथील रहिवासी असून चंद्रपुरातील एका विमा कंपनीत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
एकाश्म स्मारकांची मौलिकता स्पष्ट करताना अमित भगत म्हणाले, डोंगरगाव येथील एकाश्म स्मारक शिळा सुमारे तीन हजार वर्षांपूर्वीच्या बृदहाश्मयुगीन, महापाषणयुगीन संस्कृतीचा पुरावा आहे. नागभीड शहराच्या वायव्येस साधारणत: साडेचार किमी अंतरावरील जंगलात १० ते १२ शिलास्तंभ आढळले आहेत. भारतातील बृहदाश्यमयुगीन संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने दक्षिण भारतातच आढळले आहेत. केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील आढळलेली स्मारके महाराष्ट्रातील अन्य कोणत्याही जिल्ह्यात दिसून आली नाहीत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात बृहदाश्यमयुगीन संस्कृतीला समांतर अशी प्रगत नागरी संस्कृती नांदत होती, असा दावाही त्यांनी केला. या स्मारकांवर सखोल अभ्यास करून पुराव्यासह संशोधन लेख संशोधन पत्रिकेत प्रकाशित करू, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात बृहदाश्मयुगीन संस्कृतीचा वारसा सांगणारे एकाश्म स्मारक अद्याप आढळले नाही. या स्मारकांचा सखोल अभ्यास सुरू केला असून, चंद्रपूर जिल्ह्याचा प्राचीन तेजस्वी इतिहास पुढे मांडणार आहे.
- अमित भगत, युवा अभ्यासक