हेल्मेटधारक दुचाकीस्वारांचा वाहतूक पोलिसांकडून असाही सत्कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 03:06 PM2024-01-29T15:06:32+5:302024-01-29T15:06:48+5:30
सन २०२३ मध्ये पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात त्रिसूत्री उपक्रम राबविण्यात आले.
चंद्रपूर : ३५ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त १५ जानेवारीपासून पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. सोमवार (दि.२९) जानेवारी रोजी वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहनधारक, तसेच सीटबेल्ट घालून चारचाकी चालविणाऱ्या व हेल्मेट घालून वाहन चालविणाऱ्यांना वाहन चालकांचा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या हस्ते गुलाबाचे फूल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २०२३ मध्ये पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्ह्यात त्रिसूत्री उपक्रम राबविण्यात आले. याची फलश्रुती म्हणजे सन २०२२ च्या तुलनेत सन २०२३ मध्ये प्राणांकित अपघाताची संख्या घटली. अपघाताचे प्रमाण कमी करण्यात चंद्रपूर जिल्ह्याने संपूर्ण राज्यात तिसरा क्रमांक पटकावला.
वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पुढेही असे पालन करावे, वाहन चालकांना नियमांचे पालन करण्यासंदर्भात प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने वाहतूक पोलिसांकडून चालकांचा सत्कार करण्यात येत आहे. सोमवारी वाहतूक ऑफिससमोर हेल्मेट घालून दुचाकी चालवणारे, तसेच सीटबेल्ट लावून वाहन चालविणाऱ्या चालकांना पोलिस अधीक्षकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, तसेच पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
मोटार वाहन कायद्याविषयी जनजागृती
रस्त्यावर वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन व्हावे, याकरिता राष्ट्रीय व राज्य महामार्गावर वाहन चालवणाऱ्या चालकांना थांबवून त्यांना वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यात आली, तसेच वाहतूक नियमांचे महत्त्व व मोटार वाहन कायद्याचीसुद्धा माहिती देण्यात आली.
मागील वर्षी राबविलेल्या त्रिसूत्रीचा आपणाला बराच फायदा झाला. अपघात कमी करण्यात आपण राज्यभरात पहिल्या तीनमध्ये आलो. अपघाताची आकडेवारी पुन्हा कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने वाहन चालकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
-रवींद्रसिंह परदेशी, पोलिस अधीक्षक, चंद्रपूर