बोगस मजूर दाखवून कोट्यवधीचा घोटाळा, तीन वर्षे केली लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 11:07 AM2022-01-10T11:07:05+5:302022-01-10T11:15:28+5:30
प्रफुल्ल वाघ व त्याचे सहकारी जुन्या सागवान आणि बांबूचे अधिक उत्पादन दाखवायचे परंतु, प्रत्यक्षरीत्या कमी प्रमाणात विक्री केली जायची. कटाईसाठी बोगस मजूर दाखवून शासनाची सुमारे तीन वर्ष लूट केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
चंद्रपूर : वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयात १ कोटी ६४ लाख रुपयांचा घोटाळा (ballarpur fdcm scam) केल्याप्रकरणी तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल नरहर वाघ याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
वाघ व त्याचे सहकारी जुन्या सागवान आणि बांबूचे अधिक उत्पादन दाखवायचे परंतु, प्रत्यक्षरीत्या कमी प्रमाणात विक्री केली जायची. कटाईसाठी बोगस मजूर दाखवून शासनाची सुमारे तीन वर्ष लूट केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सन २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांत वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयांतर्गत कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात सागवान कटाई व बांबू निष्कासनाची कामे करण्यात आली. यासाठी प्रत्यक्ष कामावर लावलेल्या मजुरांपेक्षा अधिक मजूर दाखविण्यात येत होते. तसेच कटाई अधिक मालाची दाखवून विक्रीकरिता कमी माल पाठवून शासनला करोडोचा चुना लावल्याप्रकरणी वाघ यांना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक दीपक मस्के करीत आहेत.
कागदपत्र जप्त
वाघ यांच्या कार्यकाळात केलेल्या सर्व कामांची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. त्यामुळे नेमके किती मजूर त्यांनी बोगस दाखविले. किती उत्पादित माल अधिक दाखवून प्रत्यक्ष कमी दाखवला ते स्पष्ट होणार आहे.
आज संपणार पोलीस कोठडी
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रफुल्ल वाघ याला बुधवारी नागपुरातून अटक केली होती. त्याला न्यायालयात दाखल केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी त्यांची पोलीस कोठडी संपणार असल्याने न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.