पेपर मिल कामगारांची दिवाळी यंदाही सुपर बोनसशिवायच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 04:48 PM2021-11-01T16:48:24+5:302021-11-01T16:49:34+5:30

मागील ५-६ वर्षांपासून आर्थिक संकटात असल्यामुळे येथील कामगारांची दिवाळी यंदाही सुपर बोनसशिवाय साजरी करावी लागणार आहे.

bilt paper mill workers this years diwali without super bonus | पेपर मिल कामगारांची दिवाळी यंदाही सुपर बोनसशिवायच

पेपर मिल कामगारांची दिवाळी यंदाही सुपर बोनसशिवायच

googlenewsNext
ठळक मुद्देपाच-सहा वर्षांपासून पेपर मिल आर्थिक संकटात

बल्लारपूर : बल्लारपूरची आर्थिक वाहिनी म्हणून बल्लारपूर पेपर मिलला संबोधित केले जाते. मात्र, मागील ५-६ वर्षांपासून आर्थिक संकटात असल्यामुळे येथील कामगारांची दिवाळी यंदाही सुपर बोनसशिवाय साजरी करावी लागणार आहे.

बल्लारपुरातील बहुतांश बाजार हा येथील आर्थिक वाहिनी असलेल्या बल्लारपूर पेपर मिलवर आधारित आहे. सणासुदीला येथील बाजारपेठ नेहमीच फुललेली असायची. त्याला कारण म्हणजे दिवाळीत बल्लारपूर पेपर मिल कामगारांना मिळणारे बोनस. पगार, वार्षिक बोनस, फेस्टिव्हल ॲडव्हान्स आणि मुख्य म्हणजे दिवाळीत मिळणारा सुपर बोनस, असे मिळून साधारणपणे लाखांच्यावर रुपये प्रत्येक स्थायी कामगारांच्या बँक खात्यात जमा व्हायचे. त्यामुळे दिवाळीकरिता मोठ्या प्रमाणात कामगार समान खरेदी करायचे. परिणामी, येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण व्हायची; परंतु या सर्वाला २०१६ मध्ये ग्रहण लागले.

२०१६ मध्ये पेपर मिलवर आर्थिक संकट ओढवले. त्यामुळे साधारण एक वर्ष कंपनी बंद होती. मात्र, त्या कठीण समयीदेखील कंपनीने कामगारांचा पगार नियमितपणे दिला. उत्पादन बंद असल्यामुळे वाढीव उत्पादनावर मिळत असलेले सुपर बोनस त्या वर्षापासून नियमितपणे मिळणे बंद झाले. साधारण एक वर्षानंतर कंपनीचे उत्पादन सुरू झाले. कंपनीची आर्थिक स्थिती हळूहळू रुळावर येत होती. मात्र, त्यानंतर कोरोनाने रुळावर येत असलेली स्थिती पुन्हा बिघडवली.

कोरोनामुळे पेपरची मागणी घटली

२०२० मध्ये कोरोनाचा मार अख्ख्या जगाला बसला. जगभरातील बहुतांश उद्योग बंद पडले. त्या काळातही पेपर मिलही काही महिने बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी कमी झाला. मात्र, शाळा, कॉलेज व बहुतेक कार्यालये बंद असल्यामुळे पेपरच्या मागणीत मोठ्या प्रमाणात कमतरता आली. ती अद्यापही पूर्वरत भरलेली नाही. त्यामुळे कंपनीचे उत्पादन चालू बंद होत होते. त्यामुळे वाढीव उत्पादनावर मिळणाऱ्या सुपर बोनसवर परिणाम झाला. कोरोनाचा प्रादुर्भाव मागील दीड वर्षापासून सुरू आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कमतरता जरी आली असली तरी शाळा व कॉलेज अद्यापही पूर्णपणे उघडली नाही. त्यामुळे पेपरची मागणी आधी सारखी नाही. म्हणून येथील कामगारांची दिवाळी यंदाही सुपर बोनसशिवाय जाणार आहे. स्थिती लवकरच पूर्ववत होऊन दिवाळीत मिळणारा सुपर बोनस परत मिळण्याची आशा कामगार करीत आहेत.

Web Title: bilt paper mill workers this years diwali without super bonus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.