ताडोबा प्रकल्पातील जैवविविधतेची जगालाच भूरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:40+5:30
ताडोबा प्रकल्पात तब्बल ११५ वाघ व १५१ बिबट्यांचा अधिवास आहे. या दोन अद्भुत जीवांशिवाय खूप मनोहारी पक्षी आहेत. १५० पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती सुखनैव राहतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू नीलवंत म्हणजेच ब्ल्यू मॉरमॉन ताडोबात आहे. राज्यात कुठेही न आढळणाऱ्या मगरी भरपूर आहेत. चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा, नीलगाय, असे लहान शाकाहारी प्राणी भरपूर आहेत.
राजेश मडावी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पर्यटकांना वाघ दिसो की न दिसो, वाघ मात्र झाडीतून बारीक नजरेने पर्यटकांवर लक्ष ठेवून असतोच. मग वाघ पर्यटकांना पाहतोच, पण पर्यटकाला वाघ दिसेलच याची खात्री नाही, या धारणेला छेद देणारे आणि जैविविधतेच्या समृद्धीने जगालाच भूरळ घालणारे व्याघ्र प्रकल्प म्हणजे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प.
ताडोबा प्रकल्पात तब्बल ११५ वाघ व १५१ बिबट्यांचा अधिवास आहे. या दोन अद्भुत जीवांशिवाय खूप मनोहारी पक्षी आहेत. १५० पेक्षा जास्त फुलपाखरांच्या प्रजाती सुखनैव राहतात. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू नीलवंत म्हणजेच ब्ल्यू मॉरमॉन ताडोबात आहे. राज्यात कुठेही न आढळणाऱ्या मगरी भरपूर आहेत. चितळ, सांबर, भेकर, चौशिंगा, नीलगाय, असे लहान शाकाहारी प्राणी भरपूर आहेत. घुबडांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती आढळतात. तुरेवाला सर्पगरूड, मोरघार, मधुबाज, तिसा, शिक्रा आदींसह ३०० पक्ष्यांच्या प्रजाती हेही ताडोबाचे वैशिष्ट्य. पर्यटकांचा बेपर्वाईपणा, निसर्ग परिसंस्थेतील बाह्य शक्तींचा हस्तक्षेप, प्रदूषण, वन क्षेत्रालगत शेतीत कीटकनाशकांचा बेसुमार वापर, जलशुद्धीकरण, जैवविविधा नियमांकडे दुर्लक्ष व जलावरणातील रसायनांच्या अनियमनाचा धोका येथील जैवविविधतेवर घोंघावत आहे. लॉकडाऊनमुळे सध्या बंदी आहे. मात्र १७ एप्रिलपासून आॅनलाईन सफारीचा प्रयोग सुरू झाला. ४ मे २०२० पर्यंत देश- विदेशातील ६ लाख पर्यटकांनी याचा आनंद घेतला. ताडोबातील वनसंपदेमुळे जिल्ह्याला पर्यटनातून मोठा महसूल मिळतो. शिवाय हरितगृह अबाधित राहतो. ताडोबातील समृद्ध परिसंस्था जिल्ह्याच्या निसर्गात सतत भर घालत आहे.
८२८ गावातील नोंद वह्या
जैवविविधता कायद्यातंर्गत गावातील जैवविविधता कशी आहे, याचा अभ्यास करून जिल्ह्यातील ८२८ ग्रामपंचायतींनी नोंद वह्या तयार केल्या. जिल्हा समितीकडून या वह्या राज्य समितीकडे पाठविण्यात आल्या आहेत. आता त्रुटींची प्रतीक्षा आहे.
गावातील जैवविविधता नोंद वह्यांमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती, जैविक, अजैविक प्रजाती, पाण्याचे स्त्रोत, बियाण्यांचे प्रकार पशुपक्षी, प्रदूषण, विविध प्रकारच्या वनस्पती, कृमीकिटक, पिकांचे प्रकार, पाळीव प्राण्यांचीही माहिती समाविष्ट केली आहे. जैवविविधता वह्या तयार करण्यासाठी स्थानिक व्यवस्थापन समित्यांना प्रशिक्षण देण्यात आले. जि. प. पंचायत विभागाच्या मार्गदर्शनानुसार ३१ जानेवारी २०२० पर्यंत नोंदणीचे काम पूर्ण झाले. लॉकडाऊनमुळे राज्यस्तरीय कार्यवाहीला बे्रक लागला आहे.
‘हत्तीवर आरूढ सिंह’ ही चंद्रपुरातील गोंड राजांची राजमुद्रा आहे. आज जिल्ह्यात हत्ती आणि सिंहही नाही. याचा अर्थ कधीकाळी हे दोन्ही प्राणी अस्तित्वात होते. आदिवासी समाजाकडे जैवविविधता ज्ञानाचे मोठे कोठार आहे. पण, त्यांच्यापासून आम्ही काहीच शिकलो नाही. निसर्गातील प्रत्येक जीव जगलाच तरच सृष्टी टिकेल. या दृष्टीने ताडोबातील प्रत्येक घटकाच्या अभ्यासाची आज गरज आहे.
-डॉ. योगेश दुधपचारे, पर्यावरणतज्ज्ञ, चंद्रपूर
पृथ्वीवरील विविध परिसंस्थेतील प्राणी व वनस्पतींचा जैवविविधतेत समावेश होतो. जैवविविधेतून परिसरातील नागरिकांच्या उपजिविकेकडेही पाहिले पाहिजे. वन व्यवस्थापन व जैवविविधता समित्यांना सरकारने समान पाठबळ दिल्यास वन्यजीव व वनसंपदेचे अस्त्वि टिकेल.
- सुधाकर महाडोळे, कार्यकर्ता, वन समिती मेंडकी ता. ब्रह्मपूरी