नागभीड बाजार समितीत भाजपाचे वर्चस्व
By Admin | Published: March 7, 2017 12:39 AM2017-03-07T00:39:23+5:302017-03-07T00:39:23+5:30
नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपचे बाजार समितीवर १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत.
काँग्रेस तीन तर अपक्ष एक : १८ पैकी भाजपाचे १५ संचालक विजयी
नागभीड : नागभीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपचे बाजार समितीवर १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत. या बाजार समितीची रविवारी निवडणूक घेण्यात आली आणि आज सोमवारी निकाल जाहीर करण्यात आला. उल्लेखनीय असे की या बाजार समितीवर भाजपाचे ६ संचालक आधिच अविरोध निवडून आले होते.
सोसायटी गटाच्या सर्व साधारण प्रवर्गातून आधिच अविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अवेश खाँ पठाण, गणेश तर्वेकर, नागो खोकले, मनोहर चौधरी, आनंद कोरे, विलास मोहुर्ले (सर्व भाजप) आणि जनार्दन खंडाळे (काँग्रेस) यांचा समावेश आहे. सेवा सहकारी गटातील महिला प्रवर्गातून रागिणी दिगंबर पाटील गुरुपुडे, शशिकला श्रीराम माटे, या गटाच्या इतर मागास वर्गीय प्रवर्गातून रमेश गणपत बोरकर तर विमाप्र प्रवर्गातून चंद्रशेखर श्रीधर विगम निवडून आले आहेत.
ग्रामपंचायत गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गातून भैय्या रघुनाथ गिरडकर आणि अजय दयाराम देवाडे विजयी झाले आहेत. या गटाच्या अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राहुल सदाशिव रामटेके तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून दीपक पुनाजी भेंडारे निवडून आले. अडते व्यापारी मतदार संघातून विजय तुळशिराम येरणे आणि मुर्लीधर वारलू श्रीरसागर यांचा विजय झाला आहे. हमाल मापारी मतदार संघातून धनराज गोविंदा ढोक यांचा विजय झाला. ही मतमोजणी येथील राजीव गांधी सभागृहात करण्यात आली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ब्रह्मपुरीचे सहायक निबंधक सुभाष फुटाने यांनी काम पाहिले. अनिल उपासे, एस. डी. मेश्राम आणि एस. बी. सहारे यांनी त्यांना सहकार्य केले. निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष केला. (तालुका प्रतिनिधी)
तब्बल आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या बाजार समितीची निवडणूक झाल्याने सर्वाचे लक्ष या निवडणुकीकडे वेधले होते. प्रारंभी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गजानन पाथोडे यांचा गट काँग्रेससोबत बसेल, अशी चर्चा रंगली होती. पण नामांकन परत घेण्याच्या दिवशीपर्यंत चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया व गजानन पाथोडे यांच्यात मनोमिलन झाल्याने या निवडणुकीने भाजपच्या बाजूनेच वळण घेतले होते. एवढेच नाही तर भाजप समर्थित पॅनलचा विजय पक्का मानला जात होता.