जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर भाजपचा झेंडा
By admin | Published: April 6, 2017 12:28 AM2017-04-06T00:28:04+5:302017-04-06T00:30:29+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक बुधवारी दुपारी पार पडली.
समाजकल्याण सभापतिपदी पाझारे : महिला व बालकल्याण सभापतिपदी केंद्रे
चंद्रपूर : येथील जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक बुधवारी दुपारी पार पडली. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या उमेदवारांचा ३६ विरूद्ध २० असा पराभव करीत सर्व समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले.
अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात निवडणूक घेण्यात आली. यात समाजकल्याण सभापतिपदासाठी भाजपकडून ब्रिजभूषण पाझारे तर काँग्रेसकडून रूपा सुरपाम यांनी नामांकण दाखल केले. तर महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी भाजपकडून गोदावरी केंद्रे तर काँगे्रेसकडून स्मीता पारधी रिंगणात होते. मात्र दोन्ही पदांवर भाजपच्या उमेदवारांचा २० विरूद्ध ३६ असा विजय झाला.
विषय समितीसाठी भाजपकडून अर्चना जिवतोडे व संतोष तंगडपल्लीवार हे रिंगणात होते. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसकडून डॉ. करमवार व गजानन बुटके रिंगणात होते. मात्र येथेही भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेत भाजप ३३, काँग्रेस २० व अपक्ष ३ असे पक्षीय बलाबल आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेले तिनही सदस्य हे भाजपच्या गोटात गेल्याने भाजपचे संख्याबळ ३६ झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपाचे निर्वीवाद बहुमत आहे.
त्यामुळेच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून देवराव भोंगळे व उपाध्यक्ष म्हणून कृष्णा सहारे यांची यापुर्वीच निवड झाली. सभापती पदासाठी भाजपकडून अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र आज पार पडलेल्या निवडणुकीत ऐन वेळी सभापतिपदाची लॉटरी हुकल्याने दिग्गजांचा हिरमोड झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होती. (स्थानिक प्रतिनिधी)
दिग्गजांना डावलले
जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र ऐनवेळी कृष्णा सहारे यांना उपाध्यक्ष पदाची लॉटरी लागली. तसाच प्रकार सभापती पदाच्या निवडणुकीतही पाहायला मिळाला. सभापतिपदासाठी नागराज गेडाम, संजय गजपुरे, वैष्णवी बोडलावार, गायकवाड, वाकडे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र या सर्वांना डावलण्यात आले.
बांधकाम, शिक्षण व कृषी समितीकडे लक्ष
समाजकल्याण व महिला व बालकल्याण सभापतिची निवड झाली असली तरी बांधकाम, शिक्षण, कृषी समितींचे सभापती पद जिल्हा परिषदेच्या सभेत सोपविण्यात येणार आहेत. त्यामुळे विषय समितीसाठी निवड झालेले अर्चना जिवतोडे, संतोष तगंडपल्लीवार व उपाध्यक्ष कृष्णा सहारे यांच्याकडे कोणत्या समितीचे सभापतिपद सोपविण्यात येणार याकडे लक्ष लागून आहे.