जनतेच्या समस्यांचा भाजप सरकारला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2016 01:24 AM2016-01-06T01:24:57+5:302016-01-06T01:24:57+5:30
केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते.
नरेश पुगलिया यांचा हल्लाबोल : बल्लारपुरात धरणे आंदोलन
बल्लारपूर : केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी विद्यमान सरकारने लोककल्याणाचा नारा दिला होता. विकासाचे स्वप्न दाखविले होते. मात्र सत्ता मिळताच देशातील व राज्यातील भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचा विसर पडला आहे, असा हल्लाबोल माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केला.
बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमिटी, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने स्थानिक नगरपालिका चौकात शहरातील व तालुक्यातील जनतेच्या न्याय मागण्यासाठी सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव राहुल पुगलिया, गजानन गावंडे, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, तारासिंग कलशी, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, माजी नगराध्यक्ष रजनी मुलचंदानी, व्यंकटेश एम. बाल बैरय्या, अशोक नागापूरे, पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम, माजी सभापती हरीष गेडाम, नगरसेवक नासीर खान, भास्कर माकोडे, विनोद आत्राम, इस्माईल ढाकवाला, वेणू गौरकार, न.प. गट नेता देवेद्र आर्य, वसंत मांढरे, गजानन दिवसे, चेतन गेडाम यांची उपस्थिती होती.
नरेश पुगलिया पुढे म्हणाले, जिल्ह्यातील राज्याच्या मुख्यमंत्र्यासह तीन मंत्री केंद्रात व राज्यात आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे, राज्याचे अर्थ, नियोजन व वनखाते सांभाळणारे मंत्री आहेत. त्यांनी काही काळासाठी आकर्षीत करणाऱ्या घोषणा केल्या. आता मात्र केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.
ही जनतेशी दगाबाजी आहे. आर्थिक व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे धोरण सरकार राबवित आहे. परिणामी तुम्ही घोषणाबाजी केलेल्या जनतेच्या न्याय मागण्या सोडवा, यासाठी आम्हाला आंदोलनातून सरकारला जागे करावे लागत आहे, असे सांगून पुगलिया यांनी भविष्यात जन आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी घनश्याम मुलचंदानी, रामभाऊ टोंगे, हरिष गेडाम, वसंत मांढरे, गजानन गावंडे यांची भाषणे झाली. संचालन देवेंद्र आर्य यांनी तर आभार व्यंकटेश एम. बालबैरय्या यांनी मानले. यावेळी शहरातील व तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. (शहर प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांना २३ मागण्यांचे निवेदन
बल्लारपूर शहर व तालुक्यातील तब्बल २३ न्याय मागण्यांचे निवेदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. यात बल्लारपूर शहरासाठी जुनोना-कारवा-बामणी-बायपास मार्ग तयार करण्यात यावा, वनजमीनीवर अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, वर्धा नदीवर बंधारा बांधण्यात यावा, विसापूर गावासाठी उड्डान पूल बांधण्यात यावा, बल्लारपूर-विसापूर-नांदगाव- पठानपुरा मार्गाचे रुंदीकरण करुन द्विभाजक करण्यात यावा, वनउद्यानाचे काम त्वरीत सुरु करण्यात यावे, रमाई घरकुल योजनेच्या धर्तीवर आर्थिक कमकुवत घटकांना घरकुल योजना सुरु करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे.