भाजप सरकार केवळ ‘घोषणाबाज’
By admin | Published: April 13, 2017 12:38 AM2017-04-13T00:38:15+5:302017-04-13T00:38:15+5:30
भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही.
अशोक चव्हाण : पत्रकार परिषदेत डागली तोफ
चंद्रपूर : भाजप सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस पाडला जात असून केलेल्या घोषणांची अंमलबजावणी केली जात नाही. शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी ढोल-ताशाचा गजर करून राज्य सरकारने सांस्कृतिक देखावा केला. भाजप सरकार अनुचित प्रथा सुरू करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेला काँग्रेसेचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया, पक्ष निरीक्षक वजाहत मिर्जा, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, गजानन गावंडे, माजी आमदार सुभाष धोटे, राहुल पुगलिया, आसावरी देवतळे आदी उपस्थित होते.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीनिमित्त चंद्रपुरात बुधवारी सायंकाळी त्यांची प्रचार सभा झाली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, विरोधी पक्षाच्या संघर्ष यात्रेचा परिणाम म्हणून राज्य सरकार बँकांना एक लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी मागविली आहे. दुर्दैव असे की, कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारला उत्तर प्रदेश सरकारच्या योजनांचा अभ्यास करावा लागत आहे.
राज्याची स्थिती कुठे चाचली, हे कुणालाच ठावुक नाही. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याचा प्रेत ७ ते ८ तास झाडाला टांगून असते. याकडे दुर्लक्ष केले जाते. यापेक्षा दुर्दैव काय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला.
कर्जमाफी न देण्यासाठी राज्य सरकारने लावलेले तर्क हास्यास्पद असून तात्काळ कर्जमाफी देऊन आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास बँकाचा फायदा होणार असेल तर सावकारी कर्ज माफ करून त्यांना लाभ देण्याची काय गरज होती, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
मनपात काँग्रेसला चांगले यश मिळेल
ईव्हीएम मशिनबाबत नागरिकांना शंका आहे. शंका दूर करणे सरकार व प्रशासनाचे काम असून नागरिकांचा विश्वास कायम राहिला पाहिजे. चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील सर्व पदाधिकारी नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात एकजुटीने काम करीत आहेत. याचा नक्कीच फायदा होणार असून भाजप सरकार फक्त घोषणा करीत आहे. पंचशताब्दी योजनेचा पैसा देण्याऐवजी योजनाच भाजपाने बंद केली. भूमीहिन शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे देण्याऐवजी रामदेव बाबा यांना नि:शुल्क जमीन दिली जात आहे, हा अन्याय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.