भाजप सरकारची कर्जमाफी फसवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:26 PM2019-01-12T22:26:17+5:302019-01-12T22:27:59+5:30
शेतमालाला हमीभाव देण्यास भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढत असून सर्व सामान्यांच्या विरोधाचे निर्णय सरकार घेत आहे. बड्या उद्योजकांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली, असा प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : शेतमालाला हमीभाव देण्यास भाजपचे सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढत असून सर्व सामान्यांच्या विरोधाचे निर्णय सरकार घेत आहे. बड्या उद्योजकांना पाठीशी घालत आहे. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी ठरली, असा प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केले.
महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीच्यावतीने शेतमालाला हमीभाव व शेतमाल नाफेड अंतर्गत खरेदी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, प्रलंबित सिंचन प्रकल्प सुरू करणे, महागाई, बेरोजगारी, शेतीकरिता २४ तास वीज पुरवठा यासह विविध मागण्यांसाठी शासनाच्याविरोधात राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. ही यात्रा शनिवारी दुपारी क्रांतिभूमी चिमूर येथे दाखल झाली. दरम्यान प्रेरणा कन्व्हेंटच्या ग्राउंडवर जाहीर सभा झाली. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
सभेची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. याप्रसंगी शेकडो कार्यकर्त्यांनी काँगेसमध्ये प्रवेश घेतला. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सतीश वारजूकर यांच्या गावाचा विकास या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्तविक जि.प.चे काँग्रेसचे गटनेता डॉ. सतीश वारजूकर, संचालन प्रा. राम राऊत तर आभार माधव बिरजे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक काँगे्रस कार्यकत्यानी परिश्रम घेतले. संघर्ष यात्रेत व जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.
वरोऱ्यात ढोल-ताशात जनसंघर्ष यात्रेचे जंगी स्वागत
वरोरा : जनसंघर्ष यात्रा वरोºयात दाखल होताच ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. काँग्रेसचे डॉ. विजय देवतळे, डॉ. आसावरी देवतळे, भगतसिंग मालधुरे, मिलिंद भोयर, मनोहर स्वामी, संजय वाघमारे, विलास टिपले यांनी यात्रेचे स्वागत केले. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सभा घेण्यात आली. यावेळी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, मागील साडेचार वर्षांपासून केंद्रात स्थापन झालेल्या भाजप सरकारने एकाही आश्वासन पूर्ण केले नाही. जनतेची घोर निराशा झाली आहे. तेच काम महाराष्ट्र सरकारनेही केले. निवडणुकीत केंद्र व राज्याचे सरकार खाली खेचा, असे आवाहनही त्यांनी केले.
सरकारच्या योजनांचा बट्ट्याबोळ -विजय वडेट्टीवार
विधिमंडळ उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या योजनांवर आसूड ओढले. सरकारच्या अनेक योजनेचा बट्ट्याबोळ झाला आहे. उज्ज्वला गॅस योजना व पीकविमा म्हणजे सर्वसामान्यांची पिळवणूक आहे. नोटबंदी व शेतकरी विरोधी धोरणावर टीका करीत सत्ताबदलासाठी काँग्रेस कार्यकार्त्यांनी जोमाने पुढील निवडणूकांना समोरे जावून काँग्रेसचे आमदार व खासदार निवडून आणण्याचा संकल्प करा, असे आवाहनही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी केले
जनसंघर्ष यात्रेत तुरी झळकल्या
२६ डिसेंबरपासून तालुक्यातील कन्हाळगाव शिवारात तूर उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकºयांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलनाची झलक जनसंघर्ष यात्रेत बघायला मिळाली. जाहीर सभेसाठी ग्राऊंडवर उभारलेल्या मंडपाच्या खांबांना तुरीच्या पेंड्या लटकविलेल्या होत्या.
तीन तास उशीर, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती
जनसंघर्ष यात्रेची जाहीर सभा स्थानिक न्यू राष्ट्रीय प्रेरणा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात आयोजित केली होती. चिमूर, नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सकाळपासूनच येत होते. सभा तब्बल तीन तास उशीराने झाली तरीही लक्षणीय उपस्थिती होती.
कडेकोट बंदोबस्त
जनसंघर्ष यात्रेच्या सभेकरिता चिमूरात काँगे्रस कार्यकर्त्यांसह नागरिकांची सकाळपासून गर्दी उसळली होती. शहरातील सर्व मार्ग नागरिकांच्या गर्दीने फुलले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात चिमूरचे पोलीस निरीक्षक प्रमोद मदामे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा व दंगा नियंत्रण दलाचे कर्मचारी बंदोबस्तकरिता तैनात करण्यात आल होते.
सतीश वारजुकर यांना विधानसभेसाठी हिरवी झेंडी
येणाऱ्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभा क्षेत्रात डॉ. सतीश वारजुकर यांनी कामाला लागावे, असे सुतोवाच विधानसभा उपनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावर विरोधी पक्ष नेते विखे पाटील यांनी पुष्टी दिली.
३१ सरपंच व ४ उपसरपंच काँग्रेसमध्ये
जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने चिमूर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास ठेवून तालुक्यातील ३१ सरपंच व ४ उपसरपंच यांच्यासह चिमूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तुषार शिंदे, जयश्री निवटे यांनी विखे पाटील यांच्या उपस्थिती कांग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.