मनपाचे भाजप गटनेते वसंत देशमुख यांची गच्छंती अटळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:21+5:302021-09-10T04:34:21+5:30
भाजपमध्ये ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले देशमुख यांना शीर्षस्थ नेत्यांनी स्थायी समिती सभापतीपदाचे आश्वासन दिले होते. परंतु, ऐनवेळी सभापतीपदी रवी ...
भाजपमध्ये ३५ वर्षांपासून सक्रिय असलेले देशमुख यांना शीर्षस्थ नेत्यांनी स्थायी समिती सभापतीपदाचे आश्वासन दिले होते. परंतु, ऐनवेळी सभापतीपदी रवी आसवानी यांची वर्णी लागल्याने देशमुख अस्वस्थ झाले. स्थायी समितीतील आठ सदस्यांच्या निवृत्तीनंतर श्याम कनकम, संदीप आवारी व किरमे या तीन नगरसेवकांची नावे पाठविण्यास नेत्यांनी सांगितले होते. यातील शिवसेनेतून भाजपत दाखल झालेले भाजपचे सभागृह नेते आवारी यांचे नाव पाठविण्यास देशमुख यांनी विरोध केला. तिथून अंतर्गत कलह वाढतच गेला. देशमुख यांचा विरोधी पावित्रा बघून शेवटी देशमुख यांचीच गटनेते पदावरून गच्छंती करण्याचा निर्णय भाजपच्या स्थानिक नेत्यांनी घेतला. त्यासाठी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या कार्यालयात गटनेता बदलीसाठी नगरसेवकांच्या स्वाक्षरीसह अर्ज करण्यात आला. मात्र, विभागीय आयुक्तांनी ओळख परेड करावी लागेल, असे सुचवले. त्यानुसार बुधवारी नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात भाजप व मित्रपक्षांच्या नगरसेवकांची ओळख परेड झाली. भाजप व मित्रपक्ष असा ४१ नगरसेवकांचा गट आहे. ओळख परेडला ३३ नगरसेवक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता सर्व ३३ नगरसेवक येथील श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथून नागपूरसाठी रवाना झाले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास विभागीय कार्यालयात सर्वांची ओळख परेड आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे गटनेते देशमुख यांची गच्छंती अटळ मानली जात आहे. नवीन गटनेता म्हणून जयश्री जुमडे यांचे नाव देण्यात आले आहे.
बॉक्स
गटनेत्या निवडीचे पत्र तीन दिवसात येणार
नागपूर येथे ओळख परेडला भाजपचे तीन नगरसेवक गैरहजर होते. त्यामध्ये झोन दोनच्या सभापती खुशबू चौधरी, सतीश घोनमोडे आणि स्वत: वसंत देशमुख यांचा समावेश आहे. हे तिन्ही नगरसेवक एकाच प्रभागातून निवडून आले आहेत. शिवाय ते देशमुख यांचे समर्थक आहेत. भाजपसोबत आजवर मनपाच्या सत्तेत सहभागी झालेले मनसे नगरसेवक सचिन भोयर, अजय सरकार व अन्य काही नगसेवकही यावेळी गैरहजर होते. गटनेता निवडीचे पत्र तीन दिवसात येणार असल्याचे समजते.
ReplyForward