अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:18 IST2022-09-02T14:00:38+5:302022-09-02T14:18:35+5:30
अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अमित शाह अन् राज ठाकरेंची मुंबईत भेट होणार?; भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं स्पष्टीकरण!
चंद्रपूर- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिंदेगट आणि भाजपाच्या नेत्यांकडून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यामुळे भाजपा-मनसे युती होणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ५ सप्टेंबरला मुंबईत येत आहेत. अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान भाजपा आणि मनसे युतीचा नारळ फुटणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे.
अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा आणि मनसेकडून अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमित शाह आणि राज ठाकरेंच्या भेटीबाबत मला कल्पना नाही. भविष्यात काय होईल हे आज चिंतन करणं योग्य होणार नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे यांना आम्ही मित्र म्हणून भेटायला जातो. राजकीय चर्चेसाठी जात नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणुक लढेल. भाजपा आणि शिवसेना युती होईल. याआधी इतके यश मिळाले नसेल, त्यापेक्षा जास्त यश या सरकारमध्ये प्राप्त होईल, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.
Raj Thackeray: अमित शाह अन् राज ठाकरेंची भेट होण्याची शक्यता; हालचाली वाढल्या, राज्याचं लागलं लक्ष https://t.co/yiDqYUuGKH
— Lokmat (@lokmat) September 2, 2022
भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबरोबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजप मिळून मुंबई महापालिका जिंकेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मुंबई पालिकेतील शिवसेनेची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजप कंबर कसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका निवडणुका पुढील वर्षीच्या सुरूवातीला होतील, असे म्हटले जात असताना दोन-अडीच महिन्यांतच मुंबई पालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी भाजपने चालविली आहे.